
राज्यस्तरीय नवोक्रम स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत
कोल्हापूर जिल्हा अग्रेसर
ठिकणे यांचा नवोक्रम राज्यात पहिला
सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. २८ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर ठरला. स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटातून इचलकरंजीतील सेवाभारती संचलित माधव शिशु मंदिराच्या अस्मिता धर्मराज ठिकणे यांच्या ‘क्षमता विकास वर्ग’ या नवोपक्रमास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला.
नवोपक्रम स्पर्धा पाच गटांत झाली. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सात नवोपक्रमांची निवड झाली होती. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सातही स्पर्धकांनी यश संपादन केले. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून विद्यामंदिर बशाचामोळाच्या सचिन कुंडलिक देसाई यांच्या ‘दुसरे पाऊल - आनंदी शिक्षणाची चाहूल...देऊ अधिकार प्रत्येक कळीस फुलण्याचा व खुलण्याचा’ हा नवोपक्रम राज्यात दुसरा आला. सतीश दिनकर कुंभार (विद्यामंदिर बावेली) यांच्या ‘जाणीव स्पर्शाची, वेळीच शिक्षण, अन्यायापासून रक्षण’. माधवी मुकुंद शिनगारे (प्रिन्स शिवाजी विद्यालय, कोल्हापूर) यांच्या ‘स्मार्ट शब्दांजली’. माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून अजित हरी पाटील (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूल, राजापूर) यांच्या ‘माझी इंग्रजी भाषा प्रयोगशाळा’. विशेष शिक्षिका वनिता साबणेंच्या ‘दिव्यांग मुलांचे हसत खेळत बहुआयामी शिक्षण’ या नवोपक्रमास उत्तेजनार्थ, तर पर्यवेक्षीय अधिकारी गटातून रमेश कोरे यांच्या ‘करू विज्ञानाचा जागर, झाले शिक्षक इन्स्पायर’ या नवोपक्रमास राज्यात चतुर्थ क्रमांक मिळाला.
स्पर्धेसाठी डाएटचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा नोडल अधिकारी म्हणून सरिता कुदळे यांनी काम पाहिले.
-----------------
कोट
राज्यातील शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून इतर शिक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
- डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य डाएट.
---------------
कोट
सध्याचे बालशिक्षण हे बालकांना भरपूर संधी उपलब्ध करून देणारे असावे. या नवविचारांना देऊन मी शाळेमध्ये ‘क्षमता विकास वर्ग’ हा नवोपक्रम राबवला. माझ्या नवोपक्रमास जिल्हास्तर व राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याचा आनंद आहे.
- अस्मिता ठिकणे - प्रथम क्रमांक विजेत्या