वार्तापत्र

वार्तापत्र

राधानगरी
राजू पाटील

गादीचा मान, पाण्याची जाण अन् मताचं दान
राशिवडे बुद्रुक : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना राधानगरी तालुक्याने भरभरून मताधिक्य दिले. राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये एक सुप्त लाट त्यांच्याबरोबर होती. ती कुणालाही रोखता आली नाही. शाहू महाराजांना मत द्यायची भावना तयार झाली होती ती अंतिम क्षणापर्यंत कायम राहिली. याउलट महायुतीचे संजय मंडलिक यांचा नसलेला संपर्क आणि तुटलेली जनतेची नाळ हेच पराभवाचे कारण ठरले. बऱ्याच वर्षानंतर हात चिन्हाने काँग्रेसला बळकटी दिली.
-----
हा मतदारसंघ आणि आजी माजी आमदार पाहता खरे तर संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. मात्र ''गादीचा मान आणि पाण्याची जाण '' ही भावना सुरुवातीपासून अखेरपर्यंत कायम टिकली. शाहू महाराजांना प्रारंभीपासूनच राधानगरीतील लोकांचे पाठबळ मिळाले ते भुदरगड आणि आजऱ्यात कायम राहिले . ''विधानसभेचे नंतर बघू'' आता आम्ही राजांसोबत हा फॉर्म्युला दिसला. काँग्रेसकडून भोगावती कार्यक्षेत्रातील पी. एन. पाटील गट आणि दूधगंगा, भुदरगड मधील सतेज पाटील गट उत्साहाने कार्यरत राहिला. त्यांना ए. वाय. पाटील, जनता दल, शेकापक्ष, शिवसेना ठाकरे गटाची साथ होती.
संभाजीराजे आणि संयोगिता राजे यांनी गावागावांत केलेल्‍या संपर्कामुळे भावनिक वातावरण तयार झाले. त्यांनी मतदारांना जिंकले. उलट मंडलिक फारसे दिसले नाहीत. भोगावती कारखान्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेला हातातहात या निवडणुकीत तसाच राहिला. उलट बिद्री निवडणुकीत मंडलिक यांनी विरोधकांवर घेतलेले तोंडसुख त्यांनाच घातक ठरले. मंडलिक यांच्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांची धडपड थिटी पडली. के. पी. पाटील गटातील कार्यकर्त्यांना बिद्रीतीतील उट्टे काढण्याची चांगली संधी मिळाली. आजऱ्यातून जयवंतराव शिंपी आणि मुकुंदराव देसाई यांची शाहू महाराजांना साथ मिळाली.

चौकट
परिणाम घटक
सतेज पाटील व पी. एन. पाटील यांच्यामुळे काँग्रेसमध्ये उभारी
संभाजीराजे व संयोगिता राजे यांनी थेट मतदारांशी साधलेला संवाद
मंडलिकांचा पाच वर्षांत संपर्क नव्हता आणि निवडणुकीतही नाही
बिद्रीत केपींच्या विरोधात मारलेला शड्डू आणि आता चिन्ह अडचणीचे ठरले
गतवेळी मंडलिकाना मताधिक्य मिळाले होते तेच यावेळी शाहू महाराजांना मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com