इचलकरंजीत बेशिस्त वाहतूक; आराखडा कागदावरच

पोलिस-पालिका प्रशासनामध्ये समन्वयाची गरज
इचलकरंजीत बेशिस्त वाहतूक; आराखडा कागदावरच
इचलकरंजीत बेशिस्त वाहतूक; आराखडा कागदावरचsakal News

इचलकरंजी : इचलकरंजी वाहनांची वाढणारी संख्या, अरुंद रस्ते, अतिक्रमणाचा विळखा, बेशिस्त पार्किंग आदींमुळे इचलकरंजीतील वाहतूकीचा प्रश्न अत्यंत जटिल बनला आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी यापूर्वीच आराखडा तयार केला आहे. त्याला पालिका सभेमध्ये मंजुरीही दिली आहे; मात्र या आराखड्याची सक्षम अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, अनेक वर्षांनंतरही शहरातील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर सुरू होणारी वाहतुकीची समस्या शहरातून बाहेर पडेपर्यंत संपत नाही. वाहनधारकांना धोकादायकपणे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याची गरज आहे. त्यासाठी वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी आता पोलिस व पालिका प्रशासनामध्ये समन्वय असणे महत्त्वाचे बनले आहे.

मुख्य मार्गावर माल वाहतूक व प्रवासी वाहने पार्किंग करत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. माल वाहतुकीमुळे असुरक्षितता वाढली शहरात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने माल वाहतूकही २४ तास सुरू असते. दिवसा नागरिकांची वर्दळ असल्याने मुख्य मार्गावर माल वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. तरीही अशी ओव्हरलोड व ओव्हरहाईट माल वाहतूक करणारी वाहने दिवसरात्र शहरात फिरत असतात. रात्री नाही; मात्र दिवसा याचा वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य मार्गावर दिसेल तेथे ही वाहने पार्किंग होत असल्याने वाहतुकीसाठी मार्ग अरुंदच बनत आहेत. या वाहनांपाठोपाठ मोठ्या प्रवासी वाहनांचाही बेशिस्तपणा वाढला आहे. अशा वाहनांवर नियंत्रण नाही आणले तर शहरात असुरक्षितता आणखी वाढणार आहे.

सिग्नल बंदच

शहरात सध्या राजवाडा चौक, मलाबादे चौक, प्रांत कार्यालय चौक येथे सिग्नल आहेत. डेक्कन चौकात नवी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अनेक चौकांत सिग्नल यंत्रणा प्रस्तावित आहे; मात्र सध्या शहरात एकही सिग्नल सुरू नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली असून वाहतुकीची शिस्त बिघडली आहे. प्रमुख चौकात सिग्नल बंद असल्याने चारही दिशांहून येणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होऊन छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत नियोजित ठिकाणची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव

मुख्य मार्गासह वर्दळीच्या ठिकाणी जागोजागी मोकाट जनावरे आजही मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. चौकाचौकांत ही जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासाठी अनेक वर्षांपासून पालिकेने नियोजन करूनही यावर ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतुकीची शिस्त बिघडत चालली आहे. तसेच नागरिकांसह जनावरांचाही जीव टांगणीला लागला आहे. या वाहनांमुळे अनेक लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.

धूमस्टाईल वाहनांना हवा लगाम

गेल्या काही वर्षांपासून शहरात वाहने मॉडीफाय करून धूमस्टाईल वाहनांची क्रेझ वाढली आहे. नव्याने उदयास आलेली ही वाहतूक समस्या अनेकांच्या जीवावर बेतणारी ठरलेली आहे. शाळा, महाविद्यालयांच्या वेळात बाजारपेठेत मुख्य मार्गावर अनेक वर्दळीच्या ठिकाणी बेदरकारपणे जाताना या वाहनांमुळे छोटे मोठे अपघात घडतात. शिवाय या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे. अशा वाहनांच्या वेगावर लगाम घालणे आवश्‍यक आहे.

सर्वांगीण चर्चेसाठी व्यासपीठाची गरज

गेल्यावर्षी वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी वाहतूक सल्लागार समिती व सामाजिक संघटना, पोलिस प्रशासन यांची बैठक झाली होती. या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी वाहतूक समस्येच्या निवारणासाठी व्यासपीठ तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. ही घोषणा वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरणारी होती; मात्र अद्यापही या समस्येच्या व्यासपीठाची केवळ चर्चाच पाहायला मिळत आहे. वाहतूक सल्लागार समितीचे अस्तित्व फक्त कागदावरच आहे.

नव्या आराखड्याची प्रतीक्षा

दोन वर्षांपूर्वी शहरात वाहतुकीच्या प्रत्येक समस्येवर अभ्यास करून वाहतूक शाखेने नवा वाहतूक आराखडा तयार केला. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. केवळ पंधरा दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर हा आराखडा शहरात राबविण्यात आला. वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी या नव्या आराखड्याची शहराला नितांत गरज आहे; मात्र हा आराखडा अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे.

शहरात वाहतुकीची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांना असुरक्षित वाटू लागले आहे. यावर ठोस उपाययोजना राबवून शहरात वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे आहे. सिग्नलच्या ठिकाणी योग्य ताळमेळ घालून वेळ निश्चित करावी.

-कौशिक मराठे, सामाजिक कार्यकर्ते.

सध्या नवीन आराखडा लागू केलेला नाही. हा आराखडा केवळ प्रायोगिक तत्वावर लागू केला होता. यावरील हरकती विचारात घेऊन शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन पोलिस अधीक्षकांच्या मंजुरीने त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतरच वाहतुकीला चांगले वळण लागेल.

-विकास अडसूळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

  • शहरातील एकूण वाहने - १ लाख १० हजार

  • अपघात प्रवण चौक - ९

  • वाहतूक नियंत्रण ठिकाणे - ३०

  • स्वयंचलित सिग्नल ठिकाणे - ३

  • प्रस्तावित सिग्नल ठिकाणे - ४

  • वाहतूक पोलिस - २५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com