Shivsena Politcal News l पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा शड्डू; राजकीय हालचालींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उत्तरच्या पोटनिवडणुकीत लक्ष घातले.

पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा शड्डू; राजकीय हालचालींना वेग

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेसह नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने शड्डू ठोकला आहे. शिवसेनेच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी १५ आणि १६ मे रोजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत २६, २७ आणि २८ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

आघाडी झाली, नाही झाली तरीही शिवसेनेचा महापौर बनविण्याचा विडा शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उचलला असल्याचे १५ दिवसांतील स्थितीवरून दिसून येते. उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी मिटवून घेतली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे सूत जुळले.

हेही वाचा: केजरीवालांचा मास्टर स्ट्रोक; विदर्भातील बडा नेता राज्यसभेवर जाणार?

दोन-तीन गट विसर्जित करून शिवसेनेने मूठ बांधली. ज्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते, अशांना बाजूला ठेवले. नव्या होयबांना पदे दिली. कार्यकर्ते शिवसेना एके शिवसेनाच राहिले पाहिजेत, असा अजेंडा घेऊन सेना कामाला लागली आहे. आठवड्यापूर्वीच संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा संदर्भ असला तरीही त्यातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. यानंतर तालुकापातळीवर प्रमुखांच्या नियुक्ती झाल्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कोल्हापुरात दोन दिवस थांबून महापुरासह अन्य बैठका घेतल्या. शिवसेनेचा महापौर असेल, असे श्री. क्षीरसागर माध्यमांसमोर बोलून दाखवित आहेत.

कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेला परिवहन सभापतीचे पद आहे, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता नव्या बहुसदस्यीय प्रभाग समितीच्या रचनेतून किमान पंधराहून अधिक जागांवर शिवसेना विजयी होईल, अशी आखणी सुरू झाली आहे. सर्वच जागा लढवून शक्ती वाया जाण्यापेक्षा मोजक्याच जागा लढवून विजय खेचून आणण्याचे प्रयत्न आहेत.

हेही वाचा: अगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हलचाली, कार्यकारिणीत जुन्या-नव्यांची मोट

कार्यकर्त्यांना मिळणार बूस्टर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उत्तरच्या पोटनिवडणुकीत लक्ष घातले. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी टप्प्याटप्प्याने दौऱ्यावर येत आहेत. मंत्री अदित्य ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते थेट कोल्हापुरात कोणताही कार्यक्रम घेणार नसले तरीही इचलकरंजी, राधानगरी, शाहूवाडी अशा भागात येऊन ते येथील राजकारण तापविणार असल्याचे समजते. खासदार राऊत २६ मेपासून पुढे तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यातही कार्यकर्त्यांना बूस्टर मिळणार आहे.

Web Title: Upcoming Elections Of Municipal Corporation Shiv Sena Leaders Kolhapur Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top