सुनसान रस्ता, भयाण रात्र अन्‌ दोघे देवदूत...

पन्हाळ्यावर माणुसकीचे दर्शन; भोसले, मुतवल्ली यांनी पर्यटकांना सोडले सुरक्षितस्थळी
सुनसान रस्ता, भयाण रात्र अन्‌ दोघे देवदूत...
सुनसान रस्ता, भयाण रात्र अन्‌ दोघे देवदूत...sakal media

पन्हाळा : बुधवारची सायंकाळ, वाई तालुक्यातील ओझर्डे (जि. सातारा) येथील सचिन गुरव, ऋषिकेश पिसाळ, आणि विशाल कोथंबिरे कुटुंबासह मोटारीतून येथे फिरण्यासाठी आलेले. एका हॉटेलचे त्यांनी ऑनलाईन बुकिंग केल्याने त्यांना राहण्याची, जेवण्याची चिंता नव्हती. कोल्हापूर, जोतिबा करत ते रात्री सात ऐवजी उशिरा गडावर पोहचले. गडावर येण्यासाठी मुख्य रस्ता नसल्याने, रेडेघाटीमार्गे विचारत विचारत त्यांना यायला ११ वाजले.

बुकिंग केलेले हॉटेल त्यांनी शोधून काढले, पण आरक्षित केलेल्या तीन खोल्या पाहून ते चाट पडले कारण ऑनलाईन फोटोत दाखवलेल्या खोल्या आणि प्रत्यक्षातील खोल्या यात बराचा फरक होता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सोबतची लहान मुले भुकेने रडू लागली. रात्री साडेअकरा वाजता जेवण मिळणे अशक्य बनले. अक्षरशः रडकुंडीला येत त्यांनी कोल्हापुरात जाण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना आलेला कच्चा रस्ता सापडेना. कसे तरी ते येथील प्रवासी कर नाक्यावर आले.

रात्रपाळीच्या ड्यूटीला नगरपरिषद कर्मचारी सुहास भोसले होते. त्यांना या पर्यटकांनी आपली घडलेली कहाणी सांगितली. भोसले यांनी अन्य हॉटेलमध्ये जेवणाबाबत चोकशी केली?, पण वेळ झाल्याने त्यांनी भात आमटी करून देण्याची तयारी दर्शविली, पण राहण्याचा प्रश्न होताच.

या भयभीत कुटुंबाकडे आणि त्यांच्या लहान मुलांकडे पाहून सुहासने त्यांना पन्हाळ्याच्या खाली सोडण्याचा निर्णय घेतला, पण रात्री १२ वाजता रेडेघाटीच्या कच्च्या रस्त्याने परत एकटे यायचे कसे? कारण गव्यांची भीती. अखेर त्यांनी नाक्याशेजारील इम्रान मुतवल्ली यांना बरोबर घेतले आणि पर्यटकांच्या गाडीतून त्यांना बुधवार पेठेत सोडण्याचे ठरवले.

रेडेघाटीतील दाट झाडी, भयाण आणि सुनसान कच्चा रस्ता, यामुळे गाडीतील लोक घाबरू लागले, अखेर सुहासने त्यांना ओळखपत्र दाखवून ‘घाबरू नका, तुम्हाला आम्ही व्यवस्थित सोडतो’ असे आश्वासन देत गुरुवार पेठेतील एका हॉटेलमध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था करून दिली. पर्यटकांनी त्यांचे आभार मानत पाय धरले आणि आज चक्क घडलेल्या घटनेचा ई-मेलवरून पन्हाळा मुख्याधिकारी यांना माहिती देऊन सुहासचे कौतुक केले. दरम्यान, त्या कुटुबांची व्यवस्था करून सुहास, इम्रान परत चालत गडावर पोचले. ही घटना सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच सुहास आणि इम्रानवर शुभेच्छांचा वर्षाव तर झालाच पण ज्या हॉटेलमुळे पन्हाळ्याचे नाव बदनाम झाले. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्य हॉटेल व्यावसायिकांनी केली. हॉटेलचा मालक एक आणि चालवणारा दुसरा यामुळे असे प्रकार घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com