esakal | Kolhapur Rain Update: भुदरगडात वेदगंगेला पूर; आजरा तालुक्यातील 5 बंधारे पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

भुदरगडात वेदगंगेला पूर; आजऱ्यात 5 बंधारे पाण्याखाली

भुदरगडात वेदगंगेला पूर; आजऱ्यात 5 बंधारे पाण्याखाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गारगोटी (कोल्हापूर) : भुदरगड (Bhudargad) तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा नदीला (Vedganga River)पूर आला आहे. या नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक मार्गांवरील रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे. पाटगाव परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पाटगाव प्रकल्पात ७४.३१ टक्के पाणीसाठा झाला आहे. वेदगंगा नदीवरील वाघापूर, निळपण, गारगोटी, म्हसवे, करडवाडी, शेळोली, शेणगाव (Wagahpur, Nilpan, Gargoti, Mhasve, Kardwadi, Sheloli, Shengaon Dam) हे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

या मार्गावरील वाहतूक बंद असून पर्यायी मार्ग सुरू आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. त्याचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील कूर, कलनाकवाडी ओढ्यावर, गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर पांगिरेनजीक, गारगोटी-शेळोली मार्गावर सालपेवाडी, पुष्पनगरनजीक तर गारगोटी-म्हसवे मार्गावर मार्गावरील निळपण ओढ्यावरून पाणी वाहू लागले आहे. तसेच वाघापूर-मुरगूड व वाघापूर-आदमापूर रस्त्यावरही पाणी आले आल्याने हे रस्ते बंद आहेत. पावसाचा आणखी जोर वाढल्यास अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Flood Update : ''पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज''

आजरा तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली

आजरा : अंबड तालुक्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील दाभिल, देवर्डे ,साळगाव ,चांदेवाडी व शेळप ही पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . काल बुधवारपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्राबाहेर पडल्या आहेत .ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत . सोहाळे पेरणोली मार्गावर झाडे कोसळ्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. पाच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वीस गावांचा संपर्क तुटला आहे . आजरा पेरणोली मार्गावरील साळगाव बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे सोहाळे मार्गे वाहतूक वळवली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सायंकाळपर्यंत अन्य सहा बंधारे पाण्याखाली येण्याची शक्यता पाटबंधारे विभागातून व्यक्त करण्यात आली आहे.

loading image