esakal | भाजीपाला मिळणार थेट गल्लीत
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetables  Distribute Directly In Alley Kolhapur Marathi News

कोरोनाचे गांभीर्य ओळखून गर्दी टाळण्याचा भाग म्हणून उद्या बुधवारी (ता. 15) व गुरुवारी (ता. 16) शाहू मार्केट यार्डातील काही भाजीपाला अडत्यांनी सौदे करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन भाजीपाला विकता येणार आहे.

भाजीपाला मिळणार थेट गल्लीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाचे गांभीर्य ओळखून गर्दी टाळण्याचा भाग म्हणून उद्या बुधवारी (ता. 15) व गुरुवारी (ता. 16) शाहू मार्केट यार्डातील काही भाजीपाला अडत्यांनी सौदे करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन भाजीपाला विकता येणार आहे. सौद्यासाठी जो भाजीपाला येतो तोच थेट ग्राहकाच्या घरापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना विकता येईल. त्यातून शेतकऱ्याला चांगले पैसेही मिळतील तसेच बाजारपेठेतील गर्दी टाळता येणेही शक्‍य होणार आहे. 

शाहू मार्केट यार्डात एरवी भाजीपाल्याचे सौदे होतात. त्या सौद्यांत शहरातील अनेक किरकोळ भाजीपाला विक्रेते भाजी खरेदी करून तीच भाजी शहरातील विविध मंडईत विकतात. सध्या कोरोनाचे संकट आहे. ते टाळण्यासाठी लॉकडाउन आहे. सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना शासनाकडून दिल्या आहेत. तरीही भाजीपाला, फळे खरेदीच्या निमित्ताने शाहू मार्केट यार्डात अतिरिक्त गर्दी होऊ लागली. त्यात सामाजिक अंतराचे पथ्य पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक व महापालिका आयुक्तांनी बाजार समितीला सामाजिक अंतर पाळले जावे तसेच किरकोळ विक्री बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याला प्रतिसाद देण्याचा भाग म्हणून काही अडत्यांनी सौदे न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गर्दी टाळणे अपेक्षित
कोरोनाचे संकट गंभीर आहे. ते दूर करण्यासाठी तूर्त गर्दी टाळणे अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन अडते, व्यापारी, माथाडी सर्व जण करतील. गर्दी टाळून शेतकरी माल कुठेही विकू शकतात. 
- मोहन सालपे, सचिव, बाजार समिती