
गडहिंग्लज : सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत; पण, कोरोना पूर्णत: गेलेला नाही. अशातच अन्य देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. आपल्याकडेही अशीच दुसरी लाट आली तर ती थोपविण्यासाठी आतापासूनच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. खबरदारी म्हणून गावनिहाय "सुपर स्प्रेडर'ची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरून त्याबाबतचे नियोजन सुरू आहे.
कोरोना महामारीने थैमान घातले. संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांची संख्या कमालीची वाढली. तसेच रुग्णांच्या मृत्यूचा टक्काही वाढला. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. पण, गेल्या महिनाभरात रुग्ण संख्या घटली आहे. अगदी अपवादाने रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. दरम्यान, अन्य देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्याची तीव्रता पहिल्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.
दुसरी लाट आलीच तर तिला थोपविता यावे यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुपर स्प्रेडरांची तपासणी करण्याचे नियोजन आखले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर त्याबाबतचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक गावातील हेअर कटिंग करणारे, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, रेशन दुकानदार, किराणा मालाचे दुकानदार, दूध संकलन केंद्रातील कर्मचारी, दूध वाटप करणारे, औषध विक्रेते या घटकांची यादी तयार केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करताना सुपर स्प्रेडरना दक्षता घेण्याबाबत व आवश्यकता भासल्यास उपचाराचा सल्ला दिला जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात या सुपर स्प्रेडरांची कोविड-19 तपासणी केली जाणार आहे. दर पंधरा दिवसांनी त्यांची तपासणी करण्याचे नियोजन आहे. यातून एखादा व्यक्ती कोरोना बाधित आढळलाच तर त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच सुपर स्प्रेडरांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते. त्यांना होणारा संभाव्य संसर्ग रोखणे शक्य होणार आहे.
बाजाराच्या गावांना प्राधान्य...
प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील सुपर स्प्रेडरांच्या कोविड-19 तपासणी होणार आहे. पण, पहिल्या टप्प्यात आठवडा बाजार भरणाऱ्या मोठ्या गावांना प्राधान्य दिले आहे. कारण, या गावामध्ये तुलनेत गर्दीचे प्रमाण अधिक असते. त्यानंतर अन्य गावातील सुपर स्प्रेडरांची तपासणी केली जाईल.
जागेवर होणार तपासणी...
कोविड-19 तपासणीसाठी यापूर्वी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरवर जावे लागत होते. पण, सुपर स्प्रेडरांची तपासणी जागेवर केली जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी स्वत: येणार आहेत. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना तपासणी किट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.