
कोल्हापूर - जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचे अंतिम टप्प्यातील काम लवकरच सुरू होणार आहे. सध्या संकुलामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे आणि नव्याने काही मैदाने करण्यासाठी प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण लवकरच जिल्ह्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर होणार आहे. याला मंजुरी मिळण्याची शक्यता क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे, असे असताना या ठिकाणी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरण तलाव, स्पर्धांप्रसंगी राहण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी होस्टेल, बाकीच्या खेळांसाठी इनडोअर स्टेडियमची प्रामुख्याने आवश्यकता आहे. क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये असणाऱ्या मैदानांपैकी खुले मैदान आणि त्या भावातलीच रनिंग ट्रॅक सुरू आहे. शिवाय १० मीटर शूटिंग रेंज आणि बॅडमिंटन कोर्टही सुरू आहे. मात्र, उर्वरित मैदानावरील जलतरण तलावाचा प्रश्न तर देशभर गाजला होता. शिवाय बास्केटबॉल कोर्टलाही तडे गेले आहेत. कबड्डी आणि खो-खोसाठी फक्त मोकळी जागा सोडली आहे.
जलतरण तलाव
येथील क्रीडा संकुलामधील असणाऱ्या जलतरण तलावामुळे या संकुलाच्या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा तलाव वापरासाठी योग्य नसल्याचा अहवाल समोर आल्यानंतर क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जलतरण तलाव असणे गरजेचे आहे. यानुसार या ठिकाणी नवीन जागी जलतरण तलावासाठी आवश्यक आहे. सध्या असणाऱ्या जलतरण तलावाची डागडुजी करायची झाल्यास यासाठी येणाऱ्या खर्चाच्या निम्म्याहून कमी खर्चामध्ये नवीन जलतरण तलावाचे काम पूर्ण होऊ शकते. सध्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार ५० लांबी बाय २१ मीटर रुंदीचा तसेच ७ फूट खोलीचा स्पर्धेसाठीचा जलतरण तलाव. शिवाय २५ बाय २५ मीटर लांबी रुंदीचा डायविंग तलाव असणे आवश्यक आहे. यासाठी डायविंग प्लॅटफॉर्म असून, तो १ मीटर,३ मीटर, ५ मीटर,७.५ मीटर व १० मीटर अशा विविध उंचीवर असतो. सोबतच यासाठी लागणाऱ्या चेंजिंग रूम, फिल्टरेशन रूम, पब्लिक प्लॅटफॉर्म यासह अन्य सुविधा पुरवणे गरजेचे आहे.
वसतिगृह
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा येथे झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांसाठी राहण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राज्य स्पर्धांवेळी विविध जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांची शहरातील विविध हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. सोबतच प्रवासामध्ये अधिक वेळ खर्ची पडत होता. या सर्व गोष्टींचा परिणाम खेळाडूंच्या पफॉर्मन्सवर होत असतो. या संकुलाच्या परिसरामध्येच वसतिगृह झाल्यास खेळाडूंना याचा फायदा होणार आहे. शिवाय राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठीही याचा फायदा होईल.
खुल्या मैदानावर टर्फ
या संकुलातील खुल्या मैदानावर ॲस्ट्रोटर्फ असणे गरजेचे आहे. शिवाय मध्ये असणाऱ्या प्रॅक्टिस मैदानावर आर्टिफिशियल अथवा ऑस्ट्रेलियन लॉन असणे गरजेचे आहे. याठिकाणी दररोज १०० हून अधिक खेळाडू सरावासाठी येतात. मैदानावर असणाऱ्या धुळीमुळे खेळाडूंना याचा त्रास होतो. शिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी ही मानके सांभाळणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियन लॉनचा वापर करणे आणि त्याचा सांभाळ हे दोन्ही मुद्दे खर्चिक असले तरीही आर्टिफिशियल टर्फ हा यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
इनडोअर स्टेडियम
संकुलाचा परिसरात इनडोअर स्टेडियम झाल्यास फायदा होणार आहे. अनेक स्पर्धा प्रकारांचा विचार केल्यास मैदानी खेळाच्या तुलनेत इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या खेळाची संख्या सर्वाधिक आहे. असे असूनही संकुलामध्ये इनडोअर स्टेडियम नाही. सध्या ठिकाणी असणाऱ्या खराब जलतरण तलावाच्या जागेचा वापर इनडोअर स्टेडियमसाठी करता येईल. या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्रेक्षक गॅलरी आणि त्याखाली असणाऱ्या विविध खोल्यांचा वापरही यासाठी योग्यरित्या करणे शक्य आहे. स्पर्धांव्यतिरिक्त पावसाच्या दिवसांमध्ये येथे सराव करणेही खेळाडूंसाठी फायद्याचे ठरणारेआहे. या एका इनडोअर स्टेडियममध्ये सुमारे २२ खेळ आणि त्यांच्या स्पर्धा होणे शक्य आहे. यामध्ये प्रामुख्याने बॅडमिंटन, टेबलटेनिस, कुस्ती, ज्युदो, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग यासह अन्य अनेक खेळांचा समावेश आहे. शिवाय खेळाडूंसाठी व्यायामशाळा असणेही आवश्यक आहे.
कोल्हापूरच्या या क्रीडासंकुलात अधिकाधिक सुविधा व्हाव्यात, अधिकाधिक राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. क्रीडा संकुलामधील त्रुटी दूर करणे हे प्रशासनाचे प्रथम ध्येय असेल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू असून, या बाबतचा आराखडा सादरीकरण आणि मंजुरीसाठी तयार केला आहे.
- डॉ. माणिक ठोसरे, विभागीय क्रीडा उपसंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.