Yogeshwari Kadam : सायकलिंगची क्वीन... सांगलीवाडीची योगेश्वरी कदम ; उत्तुंग कामगिरीसाठी हवीय आधुनिक सायकल

सर्वसामान्य कुटुंब... वडील पेंटर... पाचवीपासून ती जलतरण क्षेत्रात चमकदार कामगिरी करतेय. सोबतच सायकलिंगमध्येही करिअर करून वेगवेगळ्या स्पर्धा गाजवत आहे. सायकलिंग व जलतरण या दोन्ही प्रकारांत सांगलीवाडीच्या योगेश्वरी महादेव कदम हिने आजवर शेकडो पदके मिळवली आहेत.
Yogeshwari Kadam
Yogeshwari Kadam sakal

सांगली : सर्वसामान्य कुटुंब... वडील पेंटर... पाचवीपासून ती जलतरण क्षेत्रात चमकदार कामगिरी करतेय. सोबतच सायकलिंगमध्येही करिअर करून वेगवेगळ्या स्पर्धा गाजवत आहे. सायकलिंग व जलतरण या दोन्ही प्रकारांत सांगलीवाडीच्या योगेश्वरी महादेव कदम हिने आजवर शेकडो पदके मिळवली आहेत. राज्यातील अनेक नामवंत स्पर्धा तिने प्रचंड कष्टाने व अत्याधुनिक साधनांशिवाय खिशात घातल्या आहेत. ‘खेलो इंडिया’ वुमन्स सायकलिंग लीगमध्ये तिची नुकतीच निवड झाली. मात्र आर्थिक परिस्थिती व जागतिक पातळीवर टिकण्याइतकी साधनसामग्री नसल्याने ती स्पर्धेला मुकणार आहे.

योगेश्वरीने पाचव्या वर्षापासूनच मैदान जवळ केले. वडील महादेव कदम क्रीडाशौकिन. मात्र परिस्थितीमुळे त्यांना खेळातील करिअरला पूर्णविराम द्यावा लागला. योगेश्वरीला मात्र त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य देत जलतरण व सायकलिंगमध्ये उतरवले. २०१५ मध्ये जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत तिने पहिले-वहिले पदक मिळवले. पाठोपाठ २०१८-१९ मध्ये ‘मास्टर स्टार्ट’मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत विभागस्तरावर तिसरा क्रमांक मिळवला. इंटरझोनल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत तिने उठावदार कामगिरी केली.

‘खेलो इंडिया’ वुमन्स सायकलिंग लीगमध्ये २० किलोमीटर वैयक्तिक प्रकारात तिने प्रथम क्रमांक मिळवला. कर्नाटकातील विजयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत वुमेन्स इलाईट ८० किलोमीटर वैयक्तिक प्रकारातही ती चमकली. फेब्रुवारी-२०२४ मध्ये शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल सायकलिंग स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत तिने यशाची कमान चढती ठेवली. अमृतसर येथे झालेल्या गुरुनानक विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तिची निवड झाली. २०२१-२२ व २०२२-२३ अशा सलग दोन अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सायकलिंग स्पर्धांत सहभागी होणारी ती पहिली सायकलपटू ठरलीय.

जलतरणपटू म्हणूनही तिने १४ वर्षांखालील वयोगटात ५ सुवर्ण, तर ३ रौप्यपदके मिळवून वैयक्तिक अजिंक्यपद मिळवले आहे. धुळे येथील ७९ व्या वरिष्ठ व लोअर एज ग्रुप जलतरण स्पर्धेतही तिने खुल्या गटात १४ पदके मिळवून देदीप्यमान कामगिरी केली. शालेय राज्यस्तरीय स्पर्धा, सबज्युनियर स्पर्धा, राज्यस्तरीय ओपन सी स्विमिंग स्पर्धा, संक रॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया अशा ५ किलोमीटर लाँग डिस्टन्स स्पर्धेतही ती चमकलीय. ‘बटरफ्लाय’ व ‘फ्री-स्टाईल’ रिले स्पर्धेतही तिने हुकूमत कायम ठेवली आहे. सायकलिंगचे प्रशिक्षक अभिनंदन भोसले, मिरज महाविद्यालयाचे प्रा. संजय पाटील यांचे तसेच जलतरणमध्ये वैशाली मगदूम यांचे तिला मार्गदर्शन मिळत आहे.

नामवंत स्पर्धांची विजेती

मिरज महाविद्यालयात बी. एस्सी. तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या योगेश्वरीला २०२०-२१ चा जिल्हा परिषदेचा वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार मिळाला. सांगली सायक्लोथॉन, रत्नागिरी रोड रेस रोलर कोस्टर सायक्लोथॉन, पलूस येथील गो ग्रीन सायक्लोथॉन, मीरा-भाईंदर महापालिका किल्ला सायक्लोथॉनसह पसरणी घाट, आंबेनळी घाटातील अनेक स्पर्धांत ती अव्वल ठरलीय. आणखी उत्तुंग कामगिरीसाठी तिला अत्याधुनिक सायकलीची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com