esakal | तुम्हीच अंत्यसंस्कार करा असे ऐकावे लागते ; परिचारिका सारिका आनंदे यांचा अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

You have to hear the funeral; Experience of nurse Sarika Anande

रुग्णांचे नातेवाईक म्हणूनच सांभाळ करतो, काळजी घेतो. रुग्णांच्या नातेवाईकांकडून तुम्हीच अंत्यसंस्कर करून घ्या, इथंपर्यंतचे ऐकून घ्यावे लागले. सीपीआर कोरोना कक्षात काम करणाऱ्या अधीपरिचारिका सारिका उमेश आनंदे सांगत होत्या.

तुम्हीच अंत्यसंस्कार करा असे ऐकावे लागते ; परिचारिका सारिका आनंदे यांचा अनुभव

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर :  कोरोना कक्षात पहिल्या दिवशी पीपीई किट घातल्यानंतर घुसमट वाटली; पण त्यानंतर कोरोनाची भीती पळाली; पण आता सवय झाली आहे. कधी कामाचा कंटाळा केला नाही. रुग्णांचे नातेवाईक म्हणूनच सांभाळ करतो, काळजी घेतो. रुग्णांच्या नातेवाईकांकडून तुम्हीच अंत्यसंस्कर करून घ्या, इथंपर्यंतचे ऐकून घ्यावे लागले. सीपीआर कोरोना कक्षात काम करणाऱ्या अधीपरिचारिका सारिका उमेश आनंदे सांगत होत्या. कोरोना कक्षात काम करताना जगाचा विसर पडून काम करावे लागत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. चार महिने मुलांपासून त्या दूर राहिल्या. 
कोरोना कक्षात उपचार सोडाच; पण कोविड सेंटरमध्येही दाखल होताना अनेकांना भीती वाटते. अशीच भीती सुरवातीच्या काळात सारिका यांना वाटत होती; पण जो पेशा स्वीकारला आहे, तेथे इमानदारीने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. 
अंगावर पीपीई किट चढवले आणि तेव्हापासून कोरोनाची भीती संपल्याचेही त्यांनी सांगितले आणि तेथून पुढे त्यांचा संघर्ष सुरू झाला. 
पहिला त्याग त्यांना मुलांपासून करावा लागला. कोरोनाचा संसर्ग घरी पोचू नये, म्हणून त्यांनी मुलांना नातेवाईकांकडे ठेवले. पहिले चार महिने त्या मुलांनाही भेटल्या नाहीत. सलग आठवडाभर नोकरी करूनच घरी जायला मिळत होते. या काळात पती डॉ. उमेश यांचा सपोर्ट मिळाल्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे सारिका यांनी सांगितले. सुरवातीच्या काळात काहीजण तिरस्कार करीत होते; पण आता कोरोनाच सर्वत्र पोचल्यामुळे किमान बोलतात, असे आनंदे यांनी सांगितले. 
सीपीआरमधील कोरोना कक्षात सहा तासच ड्यूटी असते; मात्र ते सहा तास जग विसरून काम करावे लागते. कोरोना रुग्ण असल्यामुळे त्यांच्यासोबत कोणीही नातेवाईक नसतात. आम्हीच त्यांचे नातेवाईक बनतो. त्यांची काळजी घेणे हीच ईश्‍वर सेवा मानतो. काही वेळा पॉझिटिव्ह रुग्णांचे नातवाईक क्वॉरंटाईन असतात. त्यामुळे मृत्यूनंतरही त्यांना सीपीआरमध्ये येणे मुश्‍कील होते. अशा काळात तुम्हीच अंत्यसंस्कार करून घ्या, आम्ही कोणतीही तक्रार करणार नाही, असे निरोप नातेवाईकांकडून ऐकून घ्यावे लागत असल्याचाही अनुभव सारिका यांना आल्याचे त्यांनी सांगितले. 

अनुभव आयुष्यभर 
आठवणीत राहतील 

चार शिफ्टमध्ये काम असते. कधीही नाही म्हणून चालत नाही. कारणे सांगून चालत नाहीत. 15 वर्षांचा अनुभव येथे कामाला आला. संकट काळात काम करताना कधीही नोकरी सोडावी, असा विचार डोक्‍यात आणला नाही. किंवा चिडचीड होऊ दिली नाही. कोरोना कक्षात काम करताना आलेला अनुभव आयुष्यभर आठवणीत राहणार असल्याचेही सारिका यांनी सांगितले. 
 

loading image
go to top