
तरुणाई व्हाइटनरच्या नशेच्या विळख्यात...!
कोल्हापूर : शहरात व्हाइटनरचे (whitener) व्यसन करणाऱ्या तरुणांची दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाउनच्या (lockdown) काळात तर अधिक तरुण याच्या आहारी जात आहेत. काम धंदा नाही, कॉलेज ही बंद असल्याने तरुण याकडे वळत आहेत. व्हाइटनरची नशा करणाऱ्यांबाबत कारवाईची (no fine) कुठलीही तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे या युवकांना (youth) नशेपासून परावृत्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापुरातील तरुणांसह अल्पवयीन मुले या नशेच्या आहारी जात आहेत. हातरुमालावर व्हाइटनर लावून त्यातून येणाऱ्या उग्र वासातून ही नशा केली जाते. महाविद्यालयीन युवकांना याचा विळखा अधिक पडलेला दिसतो. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउन मध्ये शैक्षणिक साहित्य, जनरल स्टोअर दुकाने बंद आहेत. परिणामी व्हाइटनर मिळणे मुश्किल झाल्याने दुकानदार तिप्पट दराने व्हाइटनरची विक्री झुप्या पद्धतीने करत आहेत. शहरातील झोपडपट्टीतील दारू, गांज्याला पर्याय म्हणुन अनेक व्यसनी तरुणांनी या नशेचा नवीन प्रकार शोधला आहे. तसेच उच्चभ्रु वसाहतीतील तरुण ही याचा वापर करत आहेत.
व्हाइटनरबरोबरच नेलपेंटच्या माध्यमातून नशा केली असल्याचेही समोर येत आहे. तसेच बाम, खोकल्याचे सिरप या पदार्थांचा ही नसेसाठी वापर केला जात आहे. नशेसाठी वापरले जाणारे हे पदार्थ छुप्या पद्धतीने उपलब्ध होतात. त्यामुळे पालक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचेही या प्रकाराकडे होत असलेले दुर्लक्ष होत आहे. तरुणांच्या आरोग्यासाठी ही नशा घातक ठरत आहे.
व्हाइटनरच्या नशेचा असा धोका...
व्हाइटनर मध्ये डायक्लोरो इथिलीन व बेझीनचे प्रमाण असल्याने याचा तीव्र स्वरूपाचा वास येतो. व्हाइटनरची नशा पाच ते आठ तास राहू शकते. या नशेमुळे तरुणांचे मानसिक संतुलन बिघडणे, झोप न येणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी आजार उद्भवू शकतात.
"व्हाइटनरची ड्रग्स म्हणुन आमच्याकडे नोंद नाही. त्यामुळे याच्या वापरावर,विक्रीवर कारवाई किंवा नियंत्रण अन्न व औषध विभाग करु शकत नाही. सरकारने हा नशेचा पदार्थ म्हणून जाहीर केला, तर मात्र त्यावर बंदी घालणे शक्य होईल."
- सपना घुणकीकर , प्रभारी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन,कोल्हापूर