Kolhapur : तरूणाईची यंदाही ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No Shave November

तरूणाईची यंदाही ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम

कोल्हापूर : चार वर्षापूर्वी "नो शेव्ह नोव्हेंबर''ची क्रेझ शहर आणि परिसरात पोचली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. यंदाही ही संकल्पना येथील तरुणाई राबवणार असून, केवळ स्टाईल म्हणून नव्हे तर या संकल्पनेतून कॅन्सरग्रस्तांबरोबरच समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला जाणार आहे. दरम्यान, यंदाही सलून व्यावसायिकांनी आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाइल्स तरुणाईसाठी उपलब्ध केल्या आहेत.

आरोग्य आणि प्रोस्टेट कॅन्सर याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जगभरात गेली काही वर्षे "नो शेव्ह नोव्हेंबर'' ही संकल्पना रुजली आहे. कर्करुग्णांवर उपचारादरम्यान केस गळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या महिन्यात दाढी न करता त्यावर खर्च होणारे पैसे कर्करुग्णांच्या मदतीसाठी देणे, अशी ही संकल्पना आहे. मात्र, त्याचवेळी वाढलेल्या दाढी-मिशांच्या स्टाईलची संधीही यानिमित्ताने तरुणाईसाठी उपलब्ध होते आणि त्यासाठी सलून व्यावसायिकही सज्ज आहेत.

तीन वर्षापूर्वी सोशल मीडियावर "नो शेव्ह नोव्हेंबर'' नावाने एक ग्रुप तयार झाला आणि अडीचशेहून अधिक तरुण या उपक्रमात सहभागी झाले. त्यातून पहिल्याच वर्षी 30 हजारांवर रक्कम जमा झाली. तीन कर्करोगाने त्रस्त रुग्णांना प्रत्येकी 10 हजारांची मदत दिली. गेल्या वर्षीही या तरुणाईने ही मोहीम अधिक व्यापक केली. गेल्या वर्षीपासून मात्र अशा ग्रुप्सची संख्याही वाढू लागली आहे आणि त्यांनी संकलित होणाऱ्या निधीतून गरजूंना मदतीचा हात दिला जाऊ लागला आहे. यंदा पाचशेहून अधिक तरूण या मोहिमेत जोडले गेले आहेत. त्याशिवाय वैयक्तिक पातळीवरही अनेक जणांचे प्रयत्न सुरू आहेत.

आमच्या उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष असून, आजवर पंधराहून अधिक जणांना मदतीचा हात दिला. यंदाही ही संकल्पना आम्ही राबवत असून, एक डिसेंबरला किमान पाच रूग्णांना मदत देण्याचे नियोजन केले आहे.

-दर्शन शहा

यंदाही नो शेव्ह नोव्हेंबरची चांगलीच क्रेझ तरूणाईमध्ये आहे. वाढलेल्या दाढी व मिशांसाठी ‘लोकल टू ग्लोबल'' अशा आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाईल्स सलूनमध्ये उपलब्ध आहेत. त्याला चांगला प्रतिसाद आहे.

-युवराज भालेकर,

सलून व्यावसायिक

loading image
go to top