
मिरजेतून माझ्यासोबत मोरेश्वर जाधव, विशाल शिंदे, आणि समीर शेख आणि चिपळूणमधून शिरिष चौधरी, वल्लभ वणजू आणि पराग धामणकर अशा सात जणांची आमची मोहीम रसाळगड पायथ्याच्या पेठवाडीतून सुरू झाली. तिथून 15 मिनिटांत पायरीमार्गाने जाताना पहिला दरवाजा पार केल्यावर मिशीवाल्या मारुतीचे दर्शन घडते. या सुबक मूर्तीच्या कमरेला कट्यार सदृश्य हत्यार देखील आहे. दुसऱ्या दरवाजानंतर थेट किल्ल्यामध्ये प्रवेश होतो. किल्ल्यावर एकंदर 17 वेगवेगळ्या आकाराच्या तोफा दिसल्या, त्यातल्या काही परदेशी बनावटीच्या असाव्यात. किल्ल्यावर मोठे झोलाई देवीचे मंदिर असून तिथेच मुक्काम टाकता येतो. मंदिरात व परिसरात सुंदर मूर्ती आहेत. समोर सुंदर दीपमाळ, विरगळी व सतीशिळा, लगत दोन बारमाही तलाव असा सुंदर परिसर आहे. तेथून बालेकिल्ल्यास जाता येते. मजबूत तटबंदी व बुरूज आणि पूर्वेस एक जुने कोठाराचे अवशेष दिसतात, त्याच्यापुढे बऱ्याच अनामिक विरांच्या समाधी दिसतात. डोंगराच्या सोंडेवरून थोडे पुढे गेल्यावर दक्षिणेकडे थोडे खाली उतरल्यावर एकखांबी पाण्याचे टाके दिसते, त्याच्या आत पाहिले तर भिंतीमध्ये तांत्रिक गणपतीची मूर्ती देखील कोरलेली आहे. साधारण अडीच तासात गड प्रदक्षिणा पूर्ण होते.
तेथून आम्ही महिपतगडाकडे कूच केले. खराब रस्त्याने चालकाची परीक्षाच लागते. पायथ्यापासून गडावर जायला दीड-दोन तास पुरतात. तटबंदीचे जुने दगडी बांधकाम, मातीने बुजलेला तलाव वाटेत दिसतो. गडाच्या एकूण सहा दरवाजांपैकी अस्तित्वातील कोतवाल दरवाजाखालील दोन बुरुज थोडे सुस्थितीत आढळतात. अनेक अवशेष सर्वत्र आहेत. किल्ल्यावर सुंदर असे पारेश्वराचे मंदिर आहे, त्याच्यासमोर एक गोड पिण्यायोग्य पाण्याची विहीर आहे, तिथं आमचा मुक्काम पडला. महिपतगडावरून प्रतापगड, मधूमकरंदगड, चकदेव, परबत अशी सह्याद्रीची डोंगररांग मंत्रमुग्ध करते.
दुसऱ्या दिवशी महिपतगडावरून सुमारगडास पायी भटकंती होती. चार तासांची ही जंगल वाट आहे. वाटेत एका बाजूला कातळ व दुसऱ्या बाजूला खोल दरी अशी धोकादायक छोटीशी पायवाटही आहे. वाटेत छोटी छोटी भुयारे दिसतात. पुढे गेल्यावर लोखंडी शिडी लागते. सुमारगडावर पाण्यासाठी तलाव व बरीच कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत, गडावर दोन मंदिराचे अवशेष आहेत, याशिवाय इतर पाण्याची टाकी, गुहा, जोतीचे बांधकाम मातीत गाडले गेल्यामुळे ते दिसून येत नाही. सुमारगड हा तसा खूप दमछाक करणारा असून तेथून निसर्गरम्य सौंदर्य, सह्याद्रीचा रुद्रपणा, गुहा आणि भुयारे यासाठी भटक्या मंडळीत खूप प्रसिद्ध आहे. मात्र हा किल्ला फिरस्तीसाठी माहितगार वाटाड्या सोबत हवाच.
तिसऱ्या दिवशी चिपळूणमधील निसर्गरम्य वाशिष्ठी नदीच्या काठावरील छोटेखानी असा गोवळकोट किल्ला फिरून आमच्या मोहिमेची सांगता झाली. तिन्ही बाजूंनी वेढलेल्या नदीचे नयनरम्य दर्शन आणि किल्ल्यावर काही तोफांचे दर्शन पहावे असे. सुमारे तासाभरात हा किल्ला फिरून होतो.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.