फलटणला न्याय अन्‌ कोरेगाववर अन्याय

पांडुरंग बर्गे 
सोमवार, 2 जुलै 2018

कोरेगाव - केंद्र शासनाने ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु, फलटण वगळता कोरेगाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी घातलेल्या हरभऱ्याची दमडीही न मिळाल्याने शेतकरी वर्गाची खरीप पेरणीची मोठी अडचण झाली आहे. या केंद्रातील ६४७ शेतकऱ्यांचे एक कोटी ६४ लाख ९५ हजार ६०० रुपये आजमितीला येणे आहे. 

कोरेगाव - केंद्र शासनाने ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु, फलटण वगळता कोरेगाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी घातलेल्या हरभऱ्याची दमडीही न मिळाल्याने शेतकरी वर्गाची खरीप पेरणीची मोठी अडचण झाली आहे. या केंद्रातील ६४७ शेतकऱ्यांचे एक कोटी ६४ लाख ९५ हजार ६०० रुपये आजमितीला येणे आहे. 

मात्र, फलटण केंद्रातील शेतकऱ्यांचे एक कोटी ४१ लाख ४८ हजार २०० रुपये अदा झाले आहेत.केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, स्थानिक बाजार समित्या, सहकारी खरेदी-विक्री संघांच्या संयुक्त विद्यमाने मागील खरीप हंगामामध्ये सोयाबीनसह तूर खरेदी हमीभाव केंद्रे सुरू केली होती. त्याचा शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला. उत्पादित पिकांना चांगला भाव मिळाला. ‘ऑनलाइन नोंदणी आणि ऑनलाइन पेमेंट’ या पध्दतीने खरेदी सुरळीत झाली. त्यामध्ये फारशा काही तक्रारी आल्या नाहीत. 

दरम्यान, हरभरा हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी होऊ लागल्यानंतर शासनाने एप्रिल २०१८ मध्ये सोयाबीन, तुरीप्रमाणे हरभरा हमीभाव केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेऊन पिकाच्या उपलबध्दतेनुसार त्या-त्या भागात केंद्रे सुरू केली. जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे  १६ एप्रिल २०१८ रोजी हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. 

प्रारंभी त्यांना पैसे मिळतील का ? वगैरे शंकांमुळे शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, त्यानंतर हळूहळू शेतकऱ्यांत जागृती झाल्यानंतर या केंद्रांना प्रतिसाद वाढू लागला. फलटण केंद्रात १६ एप्रिल ते १३ जूनअखेर ४५२ शेतकऱ्यांकडून तीन हजार २१५ क्विंटल, तर कोरेगाव केंद्रामध्ये याच कालावधीत ६४७ शेतकऱ्यांकडून तीन हजार ७४९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. फलटण केंद्रातील सुमारे दहा शेतकऱ्यांची बॅंक खाते क्रमांकासह इतर काही कागदपत्रे अपूर्ण असल्याने तांत्रिक कारणांमुळे हरभऱ्याचे बिल मिळाले नाही. 

बाकी जवळपास सर्व शेतकऱ्यांचे एक कोटी ४१ लाख ४८ हजार २०० रुपये बिल बॅंक खात्यावर जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शंकर सोनवलकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. कोरेगाव केंद्रात हरभरा घातलेल्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे वगैरेंची पूर्तता केली आहे. परंतु, अद्याप बिल न मिळाल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी दिली.    

कोरेगाव केंद्रात हरभरा घातलेले शेतकरी गेला महिनाभर बिलासाठी बाजार समितीसह खरेदी-विक्री संघात हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्यांना आम्हाला नेमके पैसे कधी मिळतील, हे सांगता येत नाही. त्यातच शेतकऱ्यांची खरीप पेरणी सुरू झाली आहे. त्यासाठी बि- बियाणे, खत, मशागतीसाठी पैशांची गरज असताना पैसे मिळत नसल्यामुळे ते संतप्त झाले आहेत, असे कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रतापराव कुमुकले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

कोरेगाव हमीभाव केंद्रात हरभरा घातलेल्या ६४७ शेतकऱ्यांचे एक कोटी ६४ लाख ९५ हजार ६०० रुपये बिल या आठवड्यात संबंधितांना अदा न केल्यास शेतकऱ्यांसह आंदोलन करणार आहे.
-प्रतापराव कुमुकले,  सभापती, कोरेगाव तालुका शेती उत्पन्न बाजार समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koregaon news Harbhara purchasing centers start