नवीन जलवर्षासाठी कोयना धरण सज्ज

जालिंदर सत्रे
शनिवार, 23 जून 2018

पाटण - वीजनिर्मिती, सिंचन, पिण्याचे पाणी अशा सर्व पातळ्यांवर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाने एक जून २०१७ ते ३१ मे २०१८ असे जलवर्ष पूर्ण केले आहे. धरणात आज २७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १०.२७ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. नवीन जलवर्षासाठी कोयना धरण पुन्हा सज्ज झाले आहे. आता मॉन्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

पाटण - वीजनिर्मिती, सिंचन, पिण्याचे पाणी अशा सर्व पातळ्यांवर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाने एक जून २०१७ ते ३१ मे २०१८ असे जलवर्ष पूर्ण केले आहे. धरणात आज २७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १०.२७ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. नवीन जलवर्षासाठी कोयना धरण पुन्हा सज्ज झाले आहे. आता मॉन्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

जलवर्ष २०१७-१८ मध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाला होता. सिंचन व वीजनिर्मिती आणि दुष्काळ परिस्थितीत कर्नाटकला ३.१८ टीएमसी पाणी सोडल्याने धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे एक हजार मेगावॉटचा चौथा टप्पा ३५ दिवस बंद होता. एक जून रोजी गतवर्षी १९.०८ टीएमसी पाणीसाठा होता. जूनचा पहिला आठवडा सोडला, तर मॉन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असे चित्र होते. मात्र, २८ जूनला मॉन्सूनचे आगमन झाले व त्यात सातत्य राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीसाठा नियंत्रणासाठी ३० जुलैला सकाळी धरणातून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली होती.

सप्टेंबरअखेर पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा पाणी सोडूनही काटेकोर नियोजनामुळे धरण पूर्णक्षमतेने भरले होते. पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी जलवर्षात लवादाप्रमाणे ६७.५० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येतो. यावर्षी मात्र हा कोटा पूर्णक्षमतेने वापरला आहे. पूर्वेकडे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी कोयना नदीपात्रात २८ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. जलवर्ष ३१ मे रोजी संपले. त्यावेळी धरणात २९.४० टीएमसी पाणीसाठा होता.

वीजनिर्मिती, सिंचन, पिण्याचे पाणी असा योग्य वापर होऊनही काटेकोर नियोजनामुळे धरणात आज २६.६६ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो फक्त १६.३९ टीएमसी होता. आठ दिवसांपूर्वी केरळपाठोपाठ कोकणात मॉन्सूनचे दमदार आगमन झाले होते व पाटण तालुक्‍यात पाऊस हजेरी लावू लागला होता. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने सर्वांच्या नजरा मॉन्सूनच्या पावसाकडे लागल्या आहेत. 

धरणात पुरेसा पाणीसाठा
गतवर्षाचा विचार करता धरणातील पाणीसाठा दहा टीएमसी जादा असल्याने व नवीन जलवर्षास सुरवात झाल्याने कोयना धरण आजच्या स्थितीला पाणीसाठ्याच्या बाबतीत मजबूत स्थितीत असून पावसाने ओढ दिली असली तरी काळजी करण्याचे कारण नाही, असे धरण व्यवस्थापनाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koyana dam water