सांगली - कोयना धरणात आज दुपारी १०० टीएमसी इतका पाणीसाठा झाला. धरण पूर्ण भरायला अवघे ५ टीएमसी पाणी बाकी आहे. धरणातील पाण्याची आवक ९१ हजार क्युसेकहून अधिक आहे. परिणामी, आज दिवसभरात तीनवेळा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला..रात्री आठ वाजता ९५ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत बुधवारी रात्रीपर्यंत मोठी वाढ होणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३५ ते ४० फुटांपर्यंत वाढू शकते, असे स्पष्ट केले.दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाचपासून आज सायंकाळी सहापर्यंत २५ तासांत कृष्णेच्या पाणीपातळीत ९ फुटांची वाढ नोंदवली गेली. काल पाणीपातळी १५.६ फूट इतकी होती. ती आज २४.५ इतकी झाली. मंगळवारी सकाळपर्यंत ती ३० फुटांवर जाईल, असा अंदाज आहे..त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिला आणि कोयना धरणातून याच वेगाने पाणी सोडावे लागले तर मात्र पाणीपातळी सतत वाढत जाईल आणि कृष्णा नदी धोक्याच्या पातळीकडे सरकू लागेल. त्यादृष्टीने आज जिल्हा प्रशासनाकडून अतिशय गतीने हालचाली करण्यात आल्या.जिल्हाधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व यंत्रणांसह नदीच्या पाण्याची पाहणी केली. सर्वांत आधी ज्या ठिकाणी पाणी येते त्या सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी आदी भागांतील नागरिकांशी संवाद साधला..पाणीपातळी ४० फुटांवर जाईल, त्यामुळे या भागातील नागरिकांनी स्थलांतराची तयारी ठेवावी. प्रशासकीय यंत्रणा पूर्ण मदत करेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी हरिपूर येथेही पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने वाळवा, शिराळा तालुक्यांत जाऊन पाहणी करत यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या..जिल्ह्यात संततधारजिल्ह्यात आज दिवसभर पावसाने तळ ठोकला. सर्वच कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. पहाटे काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तुलनेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र आज पावसाचा जोर पुन्हा वाढला. नवजा क्षेत्रात सायंकाळी पाचपर्यंत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस होता. आता धरण पाणलोट क्षेत्राबाहेरच्या पावसावर बरेच काही अवलंबून आहे..पालकमंत्र्यांकडून आढावापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दृकश्राव्य प्रणालीव्दारे पूरस्थितीचा आढावा घेतला. २०१९ च्या पुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने, जबाबदारीने परस्पर समन्वय ठेवावा. गरजेनुरूप आवश्यक ती पूर्वतयारी व कार्यवाही करावी. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवावेत, अशा सूचना दिल्या.लोक व जनावरांचे स्थलांतर, निवारी केंद्रांची सोय आदींचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरू नये. जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी त्यांना तांत्रिक माहिती दिली..शाळांना दोन दिवसांची सुटीपाऊस आणि पुराचे संभाव्य संकट लक्षात घेता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांतील आणि महापालिका क्षेत्रातील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर केली आहे. बुधवारी आणि गुरुवारी शाळा बंद राहतील, असे आदेश त्यांनी दिले आहेत. या काळात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत हजर राहून आपत्ती व्यवस्थापन कामी सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या आहेत..आकड्यांत स्थितीकोयनेत आवक : ९१ हजार क्युसेककोयनेतून विसर्ग : ९५ हजार क्युसेकचांदोलीतून विसर्ग : ३६ हजार ३६२ क्युसेकआलमट्टी आवक : १ लाख ९ हजार क्युसेकआलमट्टी विसर्ग : १ लाख ७५ हजार क्युसेक.कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी वाढणार आहे. ती ३५ ते ४० फुटांपर्यंत जाऊ शकते. या स्थितीत आम्ही नदीकाठच्या लोकांना विश्वासात घेत चर्चा केली. त्यांनी स्थलांतराची मानसिकता आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करीत आहे. लोकांना घाबरू नये, सावध राहावे. संकट आल्यास आपण मिळून, धिराने, संयमाने त्याला तोंड देऊ. पूर्ण यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे.- अशोक काकडे, जिल्हाधिकारी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.