Krushi Kanya : आव्हाने पेलत शेतीत आणला नवा ‘ट्रेंड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Krushi Kanya

Krushi Kanya : आव्हाने पेलत शेतीत आणला नवा ‘ट्रेंड’

वाळवा : पतीच्या आकस्मिक निधनाने त्यांच्यावर आभाळच कोसळले. दुःख मोठे होते; मात्र त्यापेक्षा पुढची आव्हाने पर्वतासारखी वाटली. पतिनिधनाचा आवंढा गिळत त्यांनी पदर खोचला. खांद्यावर खोरं घेतलं. झपाझप पावले टाकत त्या द्राक्षबागेत गेल्या. मातीसोबत माती बनून त्यांनी शेती उत्पादनात नवा ‘ट्रेंड’ निर्माण केला. उच्च प्रतीच्या द्राक्ष उत्पादनाबरोबर त्यांनी बाजाराचा अभ्यास करून चांगल्या पद्धतीने आंतरपिके घेत उत्पादित भाजीपाल्याचे स्वतः ‘मार्केटिंग’ करून अतिरिक्त पैसे मिळवता येतात, याचे गमकही उलगडले. येथील इस्लामपूर रस्त्याला राहणाऱ्या श्रीमती रेखा बाळासाहेब माळी या शेतकरी महिलेची ही कहाणी स्त्रीशक्तीची ताकद दाखवणारी आहे.

रेखा या द्राक्ष पिकवतात. शेतातच घर आहे. घराजवळ द्राक्षबाग आहे. सन २००४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी शेतीची सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली. दहा वर्षांपूर्वी द्राक्ष उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जायचे. त्या वेळीही त्यांनी पाठीवर पंप घेऊन बागेत औषध फवारणी केली. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने औषध फवारणी त्या करतात. २०‌ गुंठे क्षेत्रात त्या पाऊण तासात औषध फवारणी करतात.

बागेतील सगळी कामे एकटीने करतात. फवारणी करताना कोणती कीड आणि रोगांवर कोणते आणि किती प्रमाणात औषध, यांचे दांडगे ज्ञान शून्य शिक्षण असलेल्या रेखा यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे अनेक औषधांची नावे त्या चपखलपणे सांगतात. ‘अडाणी असले तरी परिस्थितीनं सगळं शिकवलं,’ असं त्यांचं म्हणणं. श्रीमती रेखा माळी यांनी पंचावन्न गुंठ्यांपैकी केवळ वीस गुंठे क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. बाकीची जमीन त्यांनी कसायला दिली आहे.

त्याचे कारणही असे आहे की, मोठा मुलगा दोन वर्षांपूर्वी लष्करी सेवेत दाखल झाला आहे, तर लहान मुलगा पुण्यात उच्च शिक्षण घेत आहे. त्यामुळे एकटीला सगळी जबाबदारी जोपासताना कसरत करावी लागते. दरवर्षी द्राक्ष पीक संपले की बागेत त्या दोडका, गवार, दुधी भोपळ्याचे पीक घेतात. उत्पादित होणारा भाजीपाला त्या आसपासच्या बाजारात स्वतः विकतात. रेखा यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो.सुमारे सोळा तास त्या शेतात राबतात. रेखा माळी यांनी अतिशय धाडसाने आणि कष्टाने कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली आहे.