Agricultural Business : कुसुम सौर पंप योजना शेतकऱ्यांना वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kusum solar pump scheme farmers sangli agricultural business

Agricultural Business : कुसुम सौर पंप योजना शेतकऱ्यांना वरदान

सांगली : शेती व्यवसायासाठी महत्त्वाची गरज वीज आहे. ती अखंडपणे मिळण्यासाठी पीएम कुसुम सौर कृषिपंप योजना महत्त्वाची ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौरपंप वाटप करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना अखंडपणे पिकांना पाणी देणे शक्य होत आहे.

केंद्राकडून यंदा ५ लाख शेतकऱ्यांसाठी सौरपंपाचे उद्दिष्ट राज्य सरकारने घेतले आहे. यासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ३९ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. ही योजना ‘महाऊर्जा’कडून राबवली जात आहे.

राज्य शासनाचेे प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अ, ब, क मध्ये काम सुरू असून ५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचे नियोजन आहे. राज्यात फीडर सोलरायझेशनला गती देण्यात येत आहे. ही योजना सप्टेंबर २०१९ पासून राज्यात शेतकऱ्यांना कृषीच्या वापरासाठी उपलब्ध आहे.

पहिल्या टप्प्यात २५ हजार सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली होती. शेतकऱ्‍यांना दिवसा शेतीला पाणी देता यावे, यासाठी केंद्रातर्फे कुसुम सौर कृषिपंप योजना राबवण्यात येत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात यांसारख्या गोष्टींपासून मुक्ती मिळणार आहे.

एक हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्‍यांना तीन अश्‍वशक्ती, तर एक ते दोन हेक्टरपर्यंत पाच अश्‍वशक्ती, दोन हेक्टरपुढे अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सात अश्‍वशक्तीचा सौरपंप मिळणार. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना पंपाच्या किमतीच्या दहा टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के हिस्सा भरावा लागेल. सौरपंप त्वरित मिळणार आहे.

योजनेसाठी पात्र शेतकरी

शेतीसाठी पाण्याची उपलब्धता; पण पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नाही, असे सर्व शेतकरी पात्र आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला आणि शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामाईक असल्यास अन्य भागीदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र लागेल. अर्ज ऑनलाइनच भरावा लागेल.

शेतकऱ्यांचा सौरपंपासाठी अतिशय चांगला प्रतिसाद आहे. यापूर्वीचे उद्दिष्ट -पूर्तीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नव्याने येणाऱ्या उद्दिष्टांची अद्याप माहिती नाही. आदेश येताच तातडीने तयारी करण्यात येईल.

- मयूर धमगर, प्रकल्प अधिकारी, कोल्हापूर विभाग.

शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम...

तीन अश्‍वशक्ती पंप १९ हजार ८००

पाच अश्‍वशक्ती २७ हजार ९१५

सात अश्‍वशक्ती ३९ हजार

कोल्हापूर विभाग उद्दिष्ट ७४११ रुपये

मागणी अर्ज ६८७६

पात्र लाभार्थी ५४४२

कनेक्शन जोडणी १९०७

हे आहेत फायदे

  • वीजबिल भरण्यापासून कायमची मुक्ती.

  • पाच वर्षांसाठी सौरपंपाची देखभाल व दुरुस्ती कंपनी करणार

  • सौरपंप संचाचा पाच वर्षांचा विमाही कृषिपंप कंपनी उतरवणार

  • संचासोबतच दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेट मिळणार

टॅग्स :SangliPaschim maharashtra