जुन्या मेस्त्रींची निवृत्ती; नवतंत्राच्या सायकलींच्या मेस्त्रींची टंचाई 

जयसिंग कुंभार
Monday, 20 July 2020

नव नव्या तंत्राचा अंतर्भाव असलेल्या सायकलींची उपलब्धता यामुळे हौशी सायकलपटुंची संख्या चांगलीच वाढली आहे.

सांगली : गेल्या काही वर्षात व्यायाम म्हणून सायकल चालवण्याची हौस चांगलीच वाढली आहे. कोरोना टाळेबंदीने ती अधिकच वाढली. त्यात आता नव नव्या तंत्राचा अंतर्भाव असलेल्या सायकलींची उपलब्धता यामुळे हौशी सायकलपटुंची संख्या चांगलीच वाढली आहे. तथापि या सायकली दुरुस्त करणाऱ्या मेस्त्री मंडळींची मोठी टंचाई जाणवत आहे. या सायकली वापरांचे प्राथमिक स्वरुपाची माहितीचाही अभाव वापरकर्त्यांत आहे. 

सायकलला समाजातून मिळणारी प्रतिष्ठा आणि पसंती आनंदाची बाब आहे. ओघानेच आता अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या या सायकली वापराबाबतची प्राथमिक माहिती मात्र सायकलपटुंनाच नव्हे तर मेस्त्रींनाही नाही. नव्या पळत्या सायकली प्रामुख्याने परदेशी बनावटीच्या आहेत. पूर्वापार आपल्याकडील सायकलींची दुरुस्ती करणारी मंडळी आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना या नव्या तंत्राची फारशी माहिती नाही. त्यात गेल्या काही वर्षात सायकलीच कमी झाल्याने मेस्त्री मंडळीनीही या व्यवसायाला रामराम केला होता. पुर्वी चौकात चौकात पानपट्टीप्रमाणेच सायकल दुरुस्तीची दुकाने असायची. 
आता पुन्हा एकदा सायकली वाढत असून मेस्त्रीही वाढतील, असे दिसते. 
सध्या गिअर सायकलीचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. त्यांची चढ्या भावाने विक्री होते. सायकल वापराचे अज्ञान, परिणामी देखभाल खर्चही वाढतो. 

सायकलींगचे प्रशिक्षक आणि मेस्त्री अनिल माने म्हणाले,""कंपन्याच्या अधिकृत मेस्त्रींकडून सायकलीला वंगण म्हणून कोणत्याच तेलाचा वापर करु नये अशा सूचना केल्या जातात. मात्र खरे सांगायचे तर प्रत्येक सुट्या भागासाठी योग्य ते वंगण गरजेचे आहे. ते योग्य आणि पध्दतीने वापरले पाहिजे. कंपन्यांनी जुन्या सायकल मेस्त्रींसाठी कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. आज ग्राहकांना पुन्हा सायकल दुकानांमध्येच देखभाल दुरुस्तीसाठी जावे लागतेय.'' 

गिअर सायकलींच्या वापराबाबत 
- डिस्क ब्रेक, गिअर्सना योग्य सेटींगची, नियमित वंगण तेलाची गरज असते. 
- थांबलेल्या सायकलचे गिअर्स टाकणे, ब्रेक दाबणे प्रकार टाळलेच पाहिजेत. 
- वापरानंतर सायकल नेहमी सावलीतच ठेवली पाहिजे ऊन किंवा पावसात ठेवू नका. 
- वापरापुर्वी आणि वापरानंतर सायकल फडक्‍याने स्वच्छ ठेवायची सवय हवी. 
- पाण्याचा फवारा मारून सायकल धुता कामा नये. ओल्या फडक्‍याने ती पुसून काढावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of neonatal bicycle mechanics