करगणीत दहा हजार खिलार जनावरांची आवक

- नागेश गायकवाड
गुरुवार, 2 मार्च 2017

आटपाडी - करगणी (ता. आटपाडी) येथील लखमेश्‍वर यात्रा फुल्ल झाली असून, या वेळी तब्बल दहा हजार माणदेशी खिलार जनावरे दाखल झाली आहेत. खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत.

माणदेशातील नावलौकिक असलेली करगणीची यात्रा आहे. करगणीचे ग्रामदैवत लखमेश्‍वरचे (श्रीराम) पूर्वाभिमुखी प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे.

आटपाडी - करगणी (ता. आटपाडी) येथील लखमेश्‍वर यात्रा फुल्ल झाली असून, या वेळी तब्बल दहा हजार माणदेशी खिलार जनावरे दाखल झाली आहेत. खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत.

माणदेशातील नावलौकिक असलेली करगणीची यात्रा आहे. करगणीचे ग्रामदैवत लखमेश्‍वरचे (श्रीराम) पूर्वाभिमुखी प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे.

महाशिवरात्रीदिवशी यात्रेची सुरवात होते. पहिल्या दिवशी पारण्याचा सोहळा होता. त्यानंतर शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. सध्या माणदेशी खिलार जनावरांचा मोठा बाजार भरला आहे. बाळेवाडी, भिवघाट रस्ता, वीज मंडळ कार्यालय परिसर, बाजार समितीचे आवार, ग्रामीण रुग्णालय परिसरात खिलार जनावरांचा तळ ठोकला आहे. तीनशे एकर क्षेत्र पांढऱ्या खिलार जनावरांनी फुलून गेले आहे. यात्रेची रंगत वाढली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागातून जनावरे दाखल झाली आहेत. यात खिलारी जातिवंत गाई, शेतीकामाचे बैल, वळू, खोंड आदी प्रकारची जनावरे आहेत.

जनावरांच्या किमतीही गतवर्षीच्या तुलनेत चढ्या आहेत. पंचवीस हजारपासून लाख आणि दीड लाखापर्यंत वळू आणि खोंडांच्या किमती आहेत. राज्य शासन शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या तयारीत आहे. त्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

यात्रेत फक्‍त खिलार जनावरेच आहेत. ती खरेदीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातून मोठे व्यापारीही दाखल झाले आहेत. अजून किमान चार ते पाच दिवस बाजार चालणार आहे. यात्रेत दहा ते बारा हजार जनावरांची आवक झाली आहे. बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने पाण्याची आणि विजेची सोय केली आहे. यात्रेत पाच ते सहा ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या आणि टॅंकर उभा केले आहेत. तसेच दोन टॅंकर फिरते ठेवले आहेत. जनावरे खरेदी आणि विक्रीची उलाढाल सुरू झाली आहे. साऱ्याच व्यवहाराच्या नोंदी केल्या जात नाहीत. बाजार समितीच्या परस्परही मोठे व्यवहार होतात.

Web Title: lakhameshwar yatra atpadi