भूस्खलनाने साताऱ्यात "माळीण' चा धोका; प्रशासन सतर्क

विशाल पाटील
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

या भागाची भूगर्भ शास्त्रज्ञांनी अभ्यास करण्याची नितांत आवश्‍यकता आहे.

सातारा ः जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात जमीन खचण्याचे संकट घोंगावू लागले आहे. सातारा, जावळी, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्‍यातील डोंगर भागांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. अनेक घरांत पाण्याचे उपळे फुटले असून घरांनाही तडे गेले आहेत. अनेक गाव,वाड्या वस्त्यांची अवस्था "माळीण' संकटासारखी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने काही गावातील कुटुंबाचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी केले असले तरी धोकादायक परिस्थिती असलेल्या गावांतील सर्वच ग्रामस्थांना स्थलांतर करणे आवश्‍यक बनले आहे. तसेच या भागाची भूगर्भ शास्त्रज्ञांनी अभ्यास करण्याची नितांत आवश्‍यकता आहे.

प्रातिनिधिक स्वरुपात काही गावांतील माहिती.... 
- पेट्री गावास धाेका
कास (ता. सातारा) ः कास रस्त्याच्या खालच्या बाजूला वसलेल्या पेट्री (ता. सातारा) गावच्या वरच्या बाजूला असणारा कडा व त्याजवळील जमीन मोठ्या प्रमाणात खचला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात सुमारे 300 लोक राहतात. पेटेश्वर मंदीराच्या वरच्या बाजूला असणारा कडा अत्यंत धोकादायक झाला आहे. गावापासून हा कडा अवघा दोनशे मीटर अंतरावर आहे. त्यामुळे कधीही हा कडा व खचलेली जमिन ढासळून गावावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. 
तलाठी व मंडलधिकारी यांनी नुकतीच या ठिकाणची पाहणी केली आहे. याबाबत अंकुश मोरे (चेअरमन वि. का. स. सेवा सोसायटी पेट्री) म्हणाले पेट्री गावच्या वरील व खालच्या बाजूने जमीन खचली असून गावचे कधीही "माळीण' होवू शकते. 

- बेंडवाडी (ता.सातार) धाेक्यात
सातारा तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडे असलेल्या बेंडवाडी गावाच्या वरील डोंगरावर भूस्खलन होऊ लागल्याने संकट घोंगावू लागले आहे. गावाकडे जाणारा रस्ता खचला आहे. गावच्या उजव्या बाजूची भातशेती मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन वाहून गेली आहे. पवनचक्‍की भागाकडील जमिनीलाही भेगा पडल्याने प्रशासनाने दक्षता म्हणून गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. 
ठोसेघर पवनचक्‍कीच्या खालील भागात बेंडवाडी गाव आहे. त्यात सुमारे 80 उंबरठा आहे. या भागात दोन आठवड्यांपासून धुवाधार पाऊस आहे. त्यामुळे काही घरांमध्ये पाण्याचे पाझर फुटले असून, घरांचे नुकसान होत आहे. रविवारपासून (ता.4) या गावात भूस्खलन सुरू झाले आहे. परमाळे ते बेंडवाडी रस्त्याचा भागही मोठ्या प्रमाणात खचल्याने तो वाहतुकीस बंद केला आहे. गावच्या उजव्या बाजूला असलेली सुमारे पाच एकर भातशेतीचे भूस्खलन झाले आहे. त्यावरीलही रस्ता खचला आहे. शिवाय, पवनचक्‍की असलेल्या भागातही भूस्खलन होण्याची स्थिती आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयाने गावातील सर्व कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. या गावाची पाहणी प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर यांनी केली आहे. 
- टाेळेवाडीत भीषण स्थिती
सातारा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात डोंगर उंचावर असलेल्या टोळेवाडी (भैरवगड, ता. सातारा) येथे जमीन खचल्यामुळे ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली. प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. 
नागठाण्याच्या पश्‍चिमेस असलेल्या डोंगरावर भैरवगड ग्रामपंचायत आहे. त्यात टोळेवाडी, पिरेवाडी, गवळणवाडी, मानेवाडी या वाड्यांचा समावेश आहे. त्यातील टोळेवाडीत जमीन खचण्याचा प्रकार घडला. या ठिकाणी 80 ते 90 घरे आहेत. त्यातील बहुतेक घरांना भेगा पडल्या आहेत. काही घरांत पाणी येण्याचे प्रकार घडले आहेत. मांडवेतून पुन्हा आसनगावकडे येणारा डांबरी रस्ता आहे. या रस्त्याला मोठ्या भेगा गेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यालगतची, शेतातील जमीन खचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत एकच घबराट निर्माण झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The landslide hits satara taluka