कॉंग्रेस कार्यकर्त्यांना लागले आहेत निवडीचे वेध

उमेश बांबरे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या सुरवातीला सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळणार हे निश्‍चित झाले आहे.
 

सातारा : महाआघाडीचे सरकार नुकतेच सत्तेत आले असून, आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सातारा जिल्हा कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसारच जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या सुरवातीला जिल्ह्यातील कॉंग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळणार हे निश्‍चित झाले आहे. या पदासाठी जिल्ह्यातून डॉ. सुरेश जाधव, ऍड. बाळासाहेब बागवान, हिंदूराव पाटील आणि किरण बर्गे यांची नावे आघाडीवर आहेत. यातील दोघांच्या नावावर सर्वमत झाल्याचे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतून सांगितले जात आहे.
 

मदन भोसलेंपासून कॉंग्रेसला गळतीची सुरवात 

लोकसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते माढा मतदारसंघातून खासदारही झाले. त्यांच्या या पक्ष बदलामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कॉंग्रेसला दणका बसला. त्यापाठोपाठ माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे हेही भाजपमध्ये गेले. एकूणच जिल्ह्यातील कॉंग्रेसला गळती लागली. याची सुरवात वाईच्या मदन भोसले यांच्यापासून झाली.

ते सर्व प्रथम भाजपमध्ये गेले. या सर्वांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीना काही आश्‍वासन दिले होते. पुन्हा भाजपचेच सरकार येईल आणि सत्तेत सहभाग असल्यामुळे आपापल्या मतदारसंघात चांगल्या प्रकारे विकासकामे करता येतील, या आशेवर हे सर्व जण भाजपमध्ये गेले.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कॉंग्रेसची फळी आता कार्यरत

निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले; पण शिवसेनेने त्यांना साथ दिली नाही. उलट कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले. आता सत्तेत सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे; पण आता जिल्ह्यात एकमेव पृथ्वीराज चव्हाण हे आमदार असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कॉंग्रेसची फळी आता कार्यरत झाली आहे.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांना लागले आहेत निवडीचे वेध

लोकसभा, विधानसभा व लोकसभेची पोटनिवडणुक या सर्व निवडणुकांत कॉंग्रेसची जिल्हाध्यक्षाविनाच वाटचाल झाली. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आपला आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीसोबत राहिली. आता सत्ता स्थापन झाल्यापासून कॉंग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांना सर्व तालुकाध्यक्षांसह जिल्हाध्यक्ष निवडीचे वेध लागले आहेत; पण मंत्रिमंडळाचा विस्तार आणि अधिवेशन झाल्यावरच या निवडी होणार आहेत. त्यासाठी पक्ष निरीक्षक ही प्रक्रिया राबविणार आहेत.

महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत चर्चा केली होती. या चर्चेत या पदासाठी काही नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये डॉ. सुरेश जाधव, ऍड. बाळासाहेब बागवान, हिंदुराव पाटील आणि किरण बर्गे यांच्या नावांचा समावेश आहे. यातील दोघांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले असून त्यापैकी एकाची निवड होणार हे निश्‍चित आहे; पण याबाबत कॉंग्रेसचे कार्यकर्ते "वेट ऍण्ड वॉच' असे सांगू लागले आहेत. काहीही असो गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष नसलेल्या कॉंग्रेसला मंत्रिमंडळ विस्तारानंतर सक्षम आणि खमक्‍या अध्यक्ष मिळणार आहे. 

तरुण पिढी नेतृत्व घेणार 

यापूर्वी कॉंग्रेसच्या विविध कार्यक्रमांत काही ठराविक पदाधिकारी व कार्यकर्ते पाहायला मिळत होते; पण आमदार आनंदराव पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामध्ये युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनीही आघाडी घेतली आहे. हे सर्व कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे आहेत. त्यामुळे बाबांचे नेतृत्व मानणारी तरुण पिढी कॉंग्रेसचे नेतृत्व हाती घेणार असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In The Last Week Of December Or The Beginning Of The New Year It Is Certain That The Congress In Satara District Will Get The District President