मिरज शहर अतिक्रमणाच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachment

मिरज शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

मिरज - शहरातील मुख्य मार्गासह उपनगरांत अतिक्रमणांचा विळखा घट्ट होत आहे. अतिक्रमण करण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यावरील पदपथांवर हातगाड्या थांबून असतात. रस्त्यावर हातगाडी विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग झोपेचे सोंग घेत असून काही दिवसांपासून कारवाईचा पत्ताच नाही.

अतिक्रमण करणाऱ्यांचे शहर म्हणून मिरजेची ओळख बनू लागली आहे. मुख्य मिशन चौकात हातगाड्यांचा ठिय्या, प्रवासी वाहनांचा थांबा यामुळे कोंडी नित्याचीच झाली आहे. परिसरात नेहमी छोटे-मोठे अपघात होतात. शहरातील स्टेशन रस्ता, मिरज हायस्कूल रस्ता, गणेश तलाव परिसर, किल्ला भाग परिसरासह उपनगरांत अतिक्रमणाचे जाळे तयार झालेय. दुकानदारांनी रस्त्यावर छत मारून विक्रीसाठी वस्तू मांडल्या आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई केली जात नाही.

महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक नावाला उरले आहे. पथकाकडून आजपर्यंत ठोस अशी कारवाई झालेली नाही. कागदी घोडे नाचवण्यातच अधिकारी तरबेज झालेत. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांचे लोण उपनगरांतही पसरले आहे. समतानगर, ख्वॉजा वस्ती, माणिकनगर, शास्त्री चौक, कृष्णा घाट रस्त्यांसह परिसरात अतिक्रमणे वाढू लागलीत. अतिक्रमण करणाऱ्यांच्या स्पर्धेमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.

महापालिकेच्या दारात अतिक्रमण

मिरज मार्केट परिसरात महापालिकेच्या विभागीय कार्यालयाची इमारत आहे. त्याठिकाणी असणाऱ्या बागेजवळ, या कार्यालयासमोरील दुकान गाळ्यांसमोर हातगाड्यांचा ठिय्या असतो. दारातील अतिक्रमणे काढण्यात महापालिकेला जमले नाही, तर शहरातील काय काढणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.