दैव बलवत्तर: दोन वर्षाच्या लक्ष्मीच्या अंगावर पडला उकळत्या पाण्याचा ड्रम; त्वचा रोपणामुळे वाचला जीव 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

 बालिकेस  त्वचा रोपणामुळे जीवदान 

65 टक्के भाजली होती 

सांगली  : संख (ता. जत) येथील दोन वर्षाची बालिका लक्ष्मी हिच्या अंगावर उकळत्या पाण्याचा ड्रम पडून 65 टक्के भाजली होती. तिची प्रकृती गंभीर बनली असताना प्लॅस्टीक सर्जन डॉ. अविनाश पाटील यांनी भाजलेल्या जागेवर त्वचारोपण करुन तिचा जीव वाचवला. 29 दिवसांत ती पूर्ण बरी झाली.

पाटील म्हणाले,""लक्ष्मीच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने गंभीर भाजली होती. जखमेवरची त्वचा जळाल्याने असहय्य वेदना होत होत्या. रक्तस्त्राव सुरु होता. रक्तातील प्लाझ्मा मोठ्या प्रमाणात वाया जात होता. त्यामुळे तिची रोगप्रतिबंधक शक्ती कमी होत होती. जंतू संसर्ग होण्याची व सेप्टीसेमीची स्थिती उद्‌भवण्याचा धोका होता.भाजलेल्या भागावर त्वचा रोपणाचा निर्णय घेतला. रोटरी स्किन बॅंकेचील त्वचा लक्ष्मीच्या भाजलेल्या जागेवर पाचव्या आणि सहाव्या दिवशी लावण्यात आली. 

ते म्हणाले,"भाजलेल्या जागेवर त्वचा लावल्यामुळे जखमेतून वाहणारे रक्त थांबले. प्लाझ्मा वाया जाणेही थांबले. शिवाय वेदनाही कमी झाल्या. आणि त्वचेच्या आवरणामुळे जंतुंचा प्रादुर्भाव झाला नाही. महागडे सलाईन, जास्त शक्‍तीची प्रतिजैविके वापरण्यावची गरज पडली नाही. गंभीररित्या भाजली असतानाही 29 दिवसांत ती बरी होऊन तिला घरी पाठवण्यात आले. 

हेही वाचा- राजमाता जिजाऊ जयंती विशेष: ‘जिजाऊंच्या भूमिकेनं ‘स्ट्राँग’ बनवलं’ -

रोटरीच्या त्वचा बॅंकेमुळे आजवर 50 टक्केपेक्षा जास्त भाजलेल्या पाच बालकांना जीवदान मिळाले आहे. तर 19 रुग्णांच्या जखमा वेदनारहित बऱ्या झाल्या आहेत. सन 2018 मध्ये या बॅंकेची सुरवात झाली. आजवर 11 लोकांनी त्वचा दान केली आहे. त्या ठेवण्याची खास व्यवस्था या बॅंकेत केली आहे. ही त्वचा बॅंक महाराष्ट्रातील चौथी आणि देशातील आठवी बॅंक आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laxmi drum burnt case sankhya sangli