लक्ष्मी टेकडीजवळ मृत्यूचा सापळा!

वि. म. बोते
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे-बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण होऊन तो चौपदरी बनला खरा; पण जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अनेक ठिकाणी सदोष कामांमुळे धोकादायक बनला आहे. सलग नसलेले सेवा रस्ते, महामार्ग ओलांडण्यासाठी कोठेही केलेले बोगदे अशा उणिवांमुळे तो जीवघेणा बनला आहे. अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच येथे एका जवानालाही आपले प्राण गमवावे लागले. घुणकीपासून कागलपर्यंतच्या महामार्गातील उणिवांवर टाकलेला हा प्रकाश

पुणे-बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण होऊन तो चौपदरी बनला खरा; पण जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अनेक ठिकाणी सदोष कामांमुळे धोकादायक बनला आहे. सलग नसलेले सेवा रस्ते, महामार्ग ओलांडण्यासाठी कोठेही केलेले बोगदे अशा उणिवांमुळे तो जीवघेणा बनला आहे. अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच येथे एका जवानालाही आपले प्राण गमवावे लागले. घुणकीपासून कागलपर्यंतच्या महामार्गातील उणिवांवर टाकलेला हा प्रकाश

कागल - महामार्गाचे चौपदरीकरण झाले खरे; पण त्याच्या कामामध्ये अनेक उणिवा राहून गेल्या आहेत. येथील दूधगंगा नदी आणि लक्ष्मी टेकडीपर्यंत अरुंद तसेच चुकीच्या ठिकाणी केलेले बोगदे, गैरसोयीचे तुटक सेवा रस्ते धोकादायक ठरत आहेत. लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाण पुलाची नितांत आवश्‍यकता बनली आहे. लक्ष्मी टेकडी परिसर तर अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतींच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हे ठिकाण जीवघेणे ठरत आहे. महामार्गाचे सहापदरीकरण करताना येथे उड्डाण पूल व्हायलाच हवा.

येथील दूधगंगा नदी ते लक्ष्मी टेकडी मार्गावर असलेल्या चारपैकी तीन बोगदे अत्यंत अरुंद व कमी उंचीचे आहेत. या बोगद्यातून मोठ्या वाहनांना वाहतूक करता येत नाही. कागल बस स्थानकाजवळील बोगद्यातून मोठी वाहतूक होते. तो बोगदा दुहेरी असणे गरजेचे आहे. शिवाय मुरगूडकडे जाणाऱ्या वाहनांना या बोगद्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी मुरगूड फाट्याजवळ उड्डाण पूल गरजेचा आहे. नदीपासून येथील महावितरणच्या कार्यालयापर्यंतच सेवा रस्ता आहे. मात्र, हा सेवा रस्ता तुटक आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता होणे गरजेचे आहे. 

लक्ष्मी टेकडीजवळून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी मार्ग आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज, मुरगूड परिसरातून सुमारे ३० ते ३५ हजार कामगार वर्ग नोकरीसाठी येतात. तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यामुळे लक्ष्मी टेकडी परिसरात मोठी वर्दळ असते. या ठिकाणी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे व कागलच्या दिशेने मोठा उतार आहे. त्यामुळे येथे वाहनांचा वेग जास्त असतो. अनेकदा चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटते. कागलकडून एमआयडीसीकडे जाणाऱ्या तसेच एमआयडीसीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना महामार्ग ओलांडूनच जावे लागते. महामार्ग ओलांडताना सातत्याने अपघात होत असतात. येथे उड्डाण पूलासाठी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केलेला आहे. या परिसरात अनेकदा लुटमारीचे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे तेथे कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्तही असणे आवश्‍यक आहे. शिवाय दिशा दर्शक फलकही आवश्‍यक आहे. येथे सेवारस्ताही व्यवस्थीत करणे आवश्‍यक आहे.

दृष्टीक्षेपात महामार्ग -
रोज ३० ते ३५ हजार कामगारांची ये-जा
सेवारस्ता व्यवस्थित करणे आवश्‍यक
वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी उपाय योजावेत
उड्डाणपूल बांधण्यास प्राधान्य द्यावे
बोगदे योग्य रुंदीचे असावेत

लक्ष्मी टेकडी ते एसटी डेपोपर्यंत सेवा रस्ता लवकरात लवकर व्हावा. जेणेकरून कागलकडे जाणाऱ्या वाहतुकीची सोय होईल. याचा भार महामार्गावर येणार नाही. सकाळी साडेसात ते साडेनऊ आणि सायंकाळी साडेसहा या कालावधीत कामगारांची वर्दळ मोठी असते. अपघाताचे प्रमाण या वेळेत अधिक आहे. या काळात महामार्ग पोलिस या ठिकाणी असणे गरजेचे आहे. 
- उमेश चौगुले, व्यवस्थापक, किर्लोस्कर आईल

कर्नाटक हद्दीत कोगनोळीपासून रस्त्याचे काम चांगले झाले आहे. चौपदरीकरणावेळी झालेल्या त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. पालिका हद्दीपर्यंत सेवा रस्ता होणे आवश्‍यक होते. त्याबाबत रस्ते विकास प्राधिकारण, जिल्हाधिकाऱ्यांकडे त्रुटीबाबत निवेदन व तक्रारी दिल्या आहेत. एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांना पूर्व बाजूचा सेवा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सहापदरीकरणात या त्रुटी दूर न झाल्यास लक्ष्मी टेकडी ते दूधगंगा नदीपर्यंत काम करू दिले जाणार नाही.
- रमेश माळी, माजी उपनगराध्यक्ष

Web Title: laxmi hill death trap highway