esakal | फाटकवाडी प्रकल्पाला गळती ; दररोज ३०० क्युसेक पाणी वाया
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim Maharashtra

फाटकवाडी प्रकल्पाला गळती ; दररोज ३०० क्युसेक पाणी वाया

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : घटप्रभा नदीवर आधारित फाटकवाडी (ता. चंदगड) मध्यम प्रकल्पाच्या सर्व्हिस गेटला गळती लागली आहे. दररोज सुमारे २५० ते ३०० क्युसेकने पाणी वाहून जाते. दोन वर्षांपूर्वी लहान झालेली गळती मोठी झाली. त्याने धोका वाढला आहे. प्रकल्पाच्या अन्य व्यवस्थापनाकडेही पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष आहे.

२०१९ च्या महापुरानंतर प्रकल्पाच्या अस्तित्वावर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. मोठा धोका म्हणजे सर्व्हिस गेटची गळती. वेळीच दुरुस्ती न केल्यास प्रकल्पाच्या भिंतीलाच भगदाड पडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या सडेगुडवळेपासून हडलगेपर्यंतच्या ४० किलोमीटर लांबीच्या नदीच्या प्रवाहातील २३ गावांना धोका संभवतो. त्यापुढेही हे पाणी हिडकल बंधाऱ्यापर्यंत जाते. दरम्यान, सांडव्याची संरक्षक भिंत दोन वर्षांपूर्वी खचून कोसळली. त्यानंतर सांडव्यालगतचे जंगल पाच ते दहा मीटरने खचले आहे. वरच्या बाजूलाही ते खचले आहे. त्याचा प्रकल्पातील पाणीसाठ्याला धोका आहे. मुख्य दरवाजाची नियमित देखभाल होत नाही. त्याची यंत्रणा वंगण-तेलाअभावी गंजलेली आहे. भिंतीच्या पिचिंगसाठी वापरलेले दगड दिसत नाहीत. प्रकल्पाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. मुळांचा भिंतीला धोका आहे. भुदरगड तालुक्यातील मेघोली प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाकडे पाटबंधारे खाते लक्ष देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: मुंबई 'मेट्रो 3' प्रकल्पाच्या खर्चात 10 हजार 270 कोटींची वाढ

वीजनिर्मिती बंद असताना सर्व्हिस गेटमधून गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. पाईपमधील रबर खराब झाल्याने किंवा हवेचा दाब वाढत असल्याने गळतीची शक्यता आहे. त्याबाबत मेकॅनिकल विभागाकडून तपासणी केली जाईल. दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होईल.’’

- तुषार पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंदगड

दृष्टिक्षेपात फाटकवाडी प्रकल्प

- प्रकल्प कार्यान्वित- २००८ मध्ये

- साठवण क्षमता- १.५५ ‘टीएमसी’

- घटप्रभा काठावरील १५ गावांतील ६ हजार ९३६ हेक्टर शेतीला लाभ

त्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काय झाले?

रायगड येथील प्रकल्प फुटल्यावर राज्य शासनाने सर्वच प्रकल्पांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले होते. त्यात फाटकवाडीचाही समावेश होता. मात्र, त्याकडे दुर्लक्षच आहे.

loading image
go to top