
कर्नाटकच्या हद्दीत बिबट्या आढळून आल्यास त्याला जेरबंद करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
कुद्रेमानी (बेळगाव) : कुद्रेमानी, बेळगुंदी आणि शिनोळी परिसरात फिरणाऱ्या बिबट्याच्या हालचालीवर बेळगाव वनखात्याने बारीक नजर ठेवली आहे. वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला आहे. बिबट्याचा वावर कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राच्या हद्दीत अधिक असला तरी वनखात्याने पिंजरे तयार ठेवले आहेत. कर्नाटकच्या हद्दीत बिबट्या आढळून आल्यास त्याला जेरबंद करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
कुद्रेमानी व शिनोळी दरम्यान असणाऱ्या माळरानावर मंगळवारी (12) सकाळी फिरायला गेलेल्या आकाश घोरपडे यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी बिबट्याच्या वावराचे व्हिडिओ चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले. ही माहिती चंदगड विभागाच्या वनाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पायांचे ठसे आणि विष्ठा आढळून आली. त्यामुळे, सीमावर्ती भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून बेळगावच्या वनविभागानेही कुद्रेमानी, बेळगुंदी, सोनोली परिसरात आपला तळ ठोकला आहे.
हेही वाचा - काढायला गेला कर्ज अन् मिळाली मदत
आता काजू आणि आंब्याचा हंगामाला सुरवात होणार असल्याने शेतकरी बागा साफ करण्यासाठी शेतात जात आहेत. पण, बिबट्याचा वावरामुळे शेतकऱ्यांनी भीतीपोटी शेताकडे जाण्यास टाळले आहे. बिबट्याचा वावर कर्नाटकाच्या हद्दीपेक्षा महाराष्ट्रातील जंगल भागात अधिक असल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकच्या हद्दीत बिबट्या आढळून आल्यास त्याला जेरबंद करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. सापळेही तयार ठेवण्यात आले आहेत. बेळगाव वनविभागाचे पाच ते सहाजण या मोहिमेवर आहेत.
"कुद्रेमानी, बेळगुंदी सीमावर्ती भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राच्या हद्दीत तो अधिक सक्रिय आहे. बेळगाव वनखात्यानेही खबरदारी घेतली असून त्याला जेरंबद करण्याची तयारी करण्यात आली आहे."
- विनय गौडर, उपवनक्षेत्रपाल
संपादन - स्नेहल कदम