Lockdown : आता रे ! सरपंचांच्याच घरात घुसला बिबट्या...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

बिबट्यास भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. मात्र त्याला भुल चढली नाही. पुन्हा दिड तासांनी उजव्या मांडीत इंजेक्शन बसले. मात्र तरीही बिबट्या बेशुध्द झाला नाही. 

कऱ्हाड : मारुल हवेली येथील सरपंच नितीन शिंदे यांच्या घरामध्ये बिबट्या  साेमवारी (ता.30) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंबडया खाण्यासाठी शिरला. शिंदे यांच्या मुलीने बिबट्या आत शिरताना पहिला. घाबरलेल्या मुलीने तातडीने घरातल्यांना सावध केले. संबंधित कुटुंबीयांने घराचे दार बाहेरून बंद केले. बिबट्या हा घरातील पोटमाळावरच बसला होता. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी संबंधित बिबट्याला जेरबंद करायचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते हताश हाेऊन घरी परतले. 

मारुल हवेली येथील सरपंच शिंदे यांच्या घरात काल रात्री बिबट्या शिरल्याची माहिती सारंग पाटील यांना मिळाली. त्यांनी त्याची माहिती वन विभाग व रोहन भाटे यांना दिली. भाटे यांनीही तात्काळ परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व सातारा जिल्हा उपवनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा यांना माहिती दिली. त्यानंतर श्री. हाडा यांनी घटनेचे तात्काळ रेस्क्यूसाठी कर्मचारी वर्गास घटनास्थळी पोहचण्यास सांगितले. त्यानुसार श्री. भाटे, परिक्षेत्र वनाधिकारी काळे, वनरक्षक रमेश जाधवर, श्री. बर्गे, सौरभ लाड हे पिंजरा, वाघर व इतर रेस्क्यू साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेतल्यावर सरपंच शिंदे यांच्या घरात बिबट्या कोंबडया खाण्यासाठी शिरल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी संबंधित बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो पोटमाळ्यावर बसल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी एका दारला पिंजरा लावुन तो त्यात येतोय का याची खात्री केली. परंतु त्यात यश आले नाही.

अखेर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते यांना संपर्क करून त्यांच्याकडे असलेली प्राण्यांना बेशुध्द करण्याची आत्याधुनिक बंदूक मागवण्यात आली. त्याचबरोबर कोल्हापूर येथे वनविभागाचे डॉ वाळवेकर व कोल्हापूरची रेस्क्यू टीम यांना ही बोलाविण्यात आले. मध्यरात्री दोन वाजता डॉ वाळवेकर यांनी औषध डोस भरून बिबट्याला मारण्याचे प्रयत्न केला. ते बिबट्यास लागले मात्र तो बेशुध्द झाला नाही. अनेकदा प्रयत्न करुनही बिबट्याने इंजेक्शनला दाद दिली नाही. त्यानंतर बिबट्यास वाघरीमध्ये पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी वाघर कौलावर अंथरुन त्याखालची कौले काढण्यात आली. त्याचरदम्यान बिबट्याने कौले काढलेल्या ठिकाणातुन बाहेर डोकावुन एकाच दमात पत्र्यावर आणि शेतात उडी मारली. त्या परिसरातून बिबट्या पसार झाल्याने मारुल हवेली भागात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे वन विभागाकडुन प्रयत्न सुरु आहेत. रात्री दहा ते पहाटे साडेसहापर्यंत वनविभागाचे श्री. काळे, त्यांचे कर्मचारी, सरपंच शिंदे, प्रकाशराव पाटील, वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ वाळवेकर यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

Coronavirus : घाेड्यांवर आली उपासमारीची वेळ

सावधान : क्रिकेट खेळल्याबद्दल 'त्यांच्यावर' झाला गुन्हा दाखल 

कोल्हापूर येथुन आलेले डॉ वाळवेकर व कोल्हापूरच्या रेस्क्यू टीमने बिबट्यास भुलीचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक इंजेक्शन बिबट्यास उजव्या मांडीत लागले, त्यांनतर बिबट्याने जागा बदलली मात्र त्याला भुल चढली नाही. पुन्हा दिड तासांनी उजव्या मांडीत इंजेक्शन बसले. मात्र तरीही बिबट्या बेशुध्द झाला नाही. त्यानंतर डॉ वाळवेकर यांनी पुन्हा ब्लॉ पाईपने दोन वेळा डार्ट मारण्याचा प्रयत्न केला. पण तो बिबट्यास लागल्यावर त्याने चावून काढून टाकला. त्यामुळे बिबट्याने भुलीच्या इंजेक्शनलाही दाद दिली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Enters Sarpanch Home In Satara District