मिरज तालुक्‍यात प्रस्थापितांच्या डोळ्यांत अंजन; 22 ग्रामपंचायतींचे निकाल

प्रमोद जेरे
Tuesday, 19 January 2021

मिरज तालुक्‍यातील बावीस गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकांमधील जनतेचा कल हा बदलाचा असल्याचे संकेत निवडणूक निकालावरून मिळाले आहेत.

मिरज (जि. सांगली) : मिरज तालुक्‍यातील बावीस गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकांमधील जनतेचा कल हा बदलाचा असल्याचे संकेत निवडणूक निकालावरून मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हैसाळ येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सासरवाडीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव यासह पूर्व भागातील मालगाव आरग, एरंडोली, याठिकाणी झालेले सत्तांतर हे प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरले आहे. या निवडणुकांमध्ये 22 गावांपैकी सतरा गावांमध्ये 136 सदस्य भारतीय जनता पक्षाचे निवडून आल्याचा आमदार सुरेश खाडे यांचा दावाही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची झोप उडवणारा आहे. 

कोरोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील 22 गावांमध्ये झालेली ही निवडणूक राजकीयदृष्ट्या बरीच लक्षवेधी ठरली. तालुक्‍यातील बदलत्या राजकीय प्रवाहात तरुणाईही या निवडणूक निमित्ताने मोठ्या संख्येने सक्रिय झाल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. जाहीर झालेल्या निकालाचा कल पाहता राजकारणातील तरुणाई राजकीय बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे, हेही स्पष्ट झाले आहे. वास्तविक लॉकडाउनचा थोडाफार तरी परिणाम या निवडणुकीत दिसणे अपेक्षित होते;

पण नेमके उलटे चित्र सर्वांना पाहायला मिळाले. निवडणूक प्रचारातील जल्लोष, गावागावांत वाहिलेला दारूचा महापूर, हजारोंच्या पटीत कापली गेलेली बकरी आणि कोंबड्या, कोट्यवधी रुपयांच्या पटीत झालेले पैशाचे वाटप पाहता निवडणूक असलेल्या सर्व गावांमध्ये जणूकाही कशाचीच कमतरता नसल्याचा भास मतदारांना झाला. मालगावसारख्या गावात एकेका उमेदवाराचा खर्चाचा आकडा हा पाच ते सहा लाखांपासून तीस ते चाळीस लाखांपर्यंत पोहोचला; परंतु मतदारांनी अशा बडेजाव मिरवणाऱ्या उमेदवारांची खऱ्या अर्थाने जिरवली. असेच काहीसे चित्र एरंडोली, आरग, शिपूर यासह लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी या गावांमध्येही पाहायला मिळाले.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील काही गावांमध्येही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस पाहायला मिळाली. यामध्ये काही गावांमध्ये जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपला गट अधिक मजबूत केल्याचे निवडणूक निकालातून सिद्ध केले. आपापसातील मतभेद गट-तट भाऊबंदकी यासह अनेक मुद्द्यांनी सजलेले गावोगावचे राजकारण यावेळच्या निवडणूक प्रचारात आधिकच उजळून निघाले. गावागावांतील मूलभूत समस्यांपेक्षा वैयक्तिक मतभेदांच्या आणि जिरवाजिरवीच्या राजकारणावर या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी विशेष भर दिला. एरंडोलीसारख्या छोट्या गावात गावातील तरुणाईने प्रस्थापितांना धक्का देऊन नवख्या उमेदवारांना निवडून देण्याचे धाडस दाखवल्याने गावागावांतील राजकारण बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे, हेही मतपेटीद्वारे ग्रामस्थांनी गावागावांत दाखवून दिले. त्यामुळे पूर्वभागातील प्रस्थापित नेत्यांचे नेतृत्वाचे नाणे गुळगुळीत झाल्याचेही संकेत याच निकालामुळे मिळाले आहेत.

गावागावांतील अनेक मूलभूत समस्यांबाबत गावपातळीवरचे नेतृत्व पूर्ण अपयशी ठरत आहे. पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य या समस्यांबाबत राज्य सरकारकडून कसलीही दखल घेतली जात नाही. एरंडोलीसारख्या छोट्या गावात दोन कोटी रुपये खर्च होऊनही गावाचा प्राणीप्रश्न बारा-बारा वर्षे सुटत नाही, तरीही याच गावांमधील राजकारणी याबाबत निवडणुकीत ठोस भूमिका घेत नाहीत, हेही धक्कादायक चित्र याच निवडणुकीत पाहायला मिळाले. 

मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष 
गावागावांतील मूलभूत समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून झालेल्या या निवडणुकांमध्ये विजयी झालेले कारभारी किमान यापुढे तरी गावोगावच्या समस्यांबाबत संवेदनशील राहून ग्रामस्थांना न्याय देतील आणि नव्या बदलाचा नवा पायंडा राजकारणात निर्माण करतील, अशीही अपेक्षा या निवडणूक निमित्ताने ग्रामस्थांनी ठेवली तर ती गैर नाही. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lesson to established in Miraj taluka; Results of 22 Gram Panchayats