प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न अभ्यास करून सोडवू

अजित झळके 
Tuesday, 19 January 2021

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न जलद गतीने मार्गी लावूया, अशी ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघ राज्यस्तरीय शिक्षण परिषद व मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

सांगली :  प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न जलद गतीने मार्गी लावूया, अशी ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघ राज्यस्तरीय शिक्षण परिषद व मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

कोल्हापूर येथे मेळावा झाला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते. अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासह राजाराम वरुटे यांनी शिक्षक प्रश्‍नांवर लक्ष वेधले. सोयीच्या बदल्या, ऑनलाईन बदलीतील विस्थापित, शिक्षण सेवकांची मानधनवाढ, पालिकेकडील शिक्षकांचे पगार 100 टक्के करणे, ऑनलाईन बदली पोर्टल, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी, जुनी पेन्शन आदी मुद्यांवर चर्चा झाली. 

मंत्री गायकवाड म्हणाल्या,""प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत याची जाणीव आहे. त्यांचा अभ्यास करून प्राधान्य ठरवून प्रश्‍न सोडवू. कोरोनामुळे राज्यापुढे अनेक प्रश्‍न आहेत. आर्थिक अडचण आणि प्रशासकीय तांत्रिक अडचणीतून मार्ग काढू.'' 
श्री. मुश्रीफ म्हणाले,""शि. द. पाटील आमदार होते त्यावेळी मी शालेय शिक्षण राज्यमंत्री होतो. ते दमदार व अभ्यासपूर्ण होते. ग्रामीण शाळात दर्जेदार ऑनलाईन शिक्षण सुलभ व्हावे म्हणून निधीची तरतूद केली जाईल.'' 

सतेज पाटील म्हणाले,""प्राथमिक शिक्षकांना फौजदारी गुन्ह्यात साक्ष द्यावी लागते. स्थानिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या अडचणीतून मार्ग काढू. शिक्षक संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.'' राज्य सल्लागार बाळासाहेब काळे, तुकाराम कदम, स्मिता सोहनी, वसंतराव हारुगडे, भैय्या पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी विकास शिंदे, सुनिल गुरव, वसंत सावंत, सुरेश पवार, धनराज पाटील, राजू राजे, धनाजीराव माने, बाजीराव पाटील, अजित जाधव, आयबुद्धीन जमादार, दयासागर बन्ने, अशोक परीट, संतोष गुरव, सुरेश शिंगाडे, रशीद टपाल, सुरेश कांबळे, प्रकाश काळोखे उपस्थित होते.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's solve the problem of primary teachers by studying