हुश्‍श...रुतलेला गाडा सोमवारी हलणार!

The life of the jam is going to be restored to some extent now in Sangali
The life of the jam is going to be restored to some extent now in Sangali

केंद्र शासनाने बुधवारी टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्योग-कृषीसह विविध क्षेत्रांमध्ये दिलासा देणाऱ्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ठप्प जनजीवन आता काही अंशी पुर्ववत होणार आहे. या अनुषंगाने वेगवेगळ्या क्षेत्रात नेमके काय होईल आणि त्यासाठीच्या शासनाकडूनच्या अपेक्षा, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यापुढचे व्यवहार याबाबत सांगत आहेत त्या त्या क्षेत्रातील जाणकार-प्रतिनिधी. 

पुरवठा-विक्री साखळी पुर्ववत करा 

केंद्राने शेतकामातील अडथळे दूर असले तरी शेतीला बसलेला फटका काही दूर होणार नाही. फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शहरात जाणाऱ्या भाजीपाला, फळांना उत्पादनाच्या तुलनेत मागणीच नसल्यामुळे माल कवडीमोल दराने विकावा लागतोय. त्यात किती सुधारणा होणार हे महत्वाचे आहे. उत्पादन घेण्यासाठी घातलेला खर्चही वाया जाण्याची भीती आहे. उत्पादन खर्च, मजुरी खर्चही विक्रीतून निघत नसल्यामुळे शेतकरी पिकांवर नांगर फिरवत आहेत. हे चित्र येत्या आठवडाभरात बदलेल अशी आशा आहे. केवळ परवानगी देवून चालणार नाही. तर शेतीचा गाडा पुर्वपदावर येण्यासाठी या काळात अनेक पाऊले तातडीने उचलली पाहिजेत. बागायती पिकांसह खरीप हंगामासाठीची तयारी राज्य सरकारने केली पाहिजे. पुरवठा सुरळीत करतानाच टाळेबंदीत वाढलेले दर कमी करण्यासाठी प्रशासन काय करणार आहे? 

- दीपक पाटील, शेतकरी, कवलापूर. 

शेती शंभर टक्के पुर्वपदावर 
केंद्राने शेती व फळ पिकांवरील बरेच निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. शेती व शेतीशी संबधित कामे, विक्री, वाहतूक, एजन्सी सुरु राहतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. खते, बीयाणे, कीटकनाशके, दूध डेअरी उत्पादने, ड्रीप, सेवा केंद्र, दुरुस्ती केंद्र, बाजार समित्या असा शेतीचा सारा गाडा पुर्ववत सुरु होईल. किमान किंमतीने धान्यांच्या खरेदीचीही अंमलबजावणी केली जाईल. सर्व मंडईही सुरु होतील. रब्बी हंगामाच्या पार्श्‍वभूमिवर सर्व ती तयारी केली जाईल. द्राक्ष बागांसाठी लागणाऱ्या औषधांची टंचाई भासू दिली जाणार नाही. अवजारे, विक्री, दुरुस्तीला मान्यता दिली आहे. पॅकेजिक प्रकल्पांना यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. दूध, दुग्धजन्य व पूरक व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. ट्रक चालकांनाही वाहतुकीची मुभा दिली आहे. 

- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक, सांगली 

कुक्कटपालन पुर्वपदावर 

कुक्कुटपालनाचा व्यवसाय आता पुर्वपदावर येईल. प्रामुख्याने वाहतूक व्यवस्था आणि मनुष्यबळाच्या अडचणी दूर होत असल्याने सोमवारनंतर सारे काही सुरळीत होईल. आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा वाहतूक बंदीमुळे अडचणी होत्या. काही प्रमाणात अंडी आणि ब्रायलर चिकनचे व्यवसाय अडचणीतून सावरत आहेत. दरकरार झालेल्या कंपन्यांशी समन्वय साधण्यापासून ते कुक्कुटपालन व्यवसायिकांना कमी दरात परराज्यातून मका मिळवून देण्यापर्यंत आमचे प्रयत्न सुरुच आहेत. त्यामुळे हा व्यवसाय थोड्याफार अडचणी येऊनही सुरू राहिला. त्यामुळेच सध्या ब्रॉयलर चिकनला पुन्हा एकदा चांगला दर मिळतोय. अंड्यांचे दरही चांगले आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली की कुक्कुटपालनाचा व्यवसाय पूर्ववत होण्यास काहीही अडचण नाही. सध्या ब्रॉयलर चिकन आणि अंड्यानाही बाजारपेठेत उन्हाळा असूनही चांगली मागणी आहे. त्यामुळे वीस एप्रिलनंतर हा व्यवसाय निश्‍चितपणे पूर्वपदावर येईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगपासूनचे सर्व नियम पाळणेही सर्वांना बंधणकारक असेल. 

-  डॉ संजय धकाते, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन कार्यालय, मिरज 

आता खासगी डॉक्‍टरांची भूमिका 

रुग्णच येत नसल्याने सध्या खासगी हॉस्पिटल्सचे काम जवळपास दहा ते वीस टक्के इतकेच सुरु होते. जशी भिती कमी होत गेली तसे कामकाज वाढत होते. सोमवारनंतर शस्त्रक्रियांसह सर्वच कामकाज मुळ पदावर येईल. स्टाफही आता पुर्ण संख्येने येईल. मात्र यापुढे खासगी वैद्यक क्षेत्राची जबाबदारी मोठी असेल. विशेषतः सर्वच रुग्णांना आता यापुढे मास्क वापरणे सक्तीचे करावे लागेल. डॉक्‍टरांनाही कायम योग्य वैद्यकीय मास्क वापरूनच सेवा द्यावी. हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागासह गर्दीच्या ठिकाणांचे सतत सॅनिटायझेशन करणे, स्वच्छता ठेवणे, हवा खेळती ठेवणे याकडे लक्ष द्यावे लागेल. संशयित रुग्णांची माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेला देणे, रुग्णांचे प्रबोधन करणे याकडे लक्ष द्यावे लागेल. "आयएम'ची 9821808809 हेल्पलाईन यापुढेही सुरुच राहील. 

- डॉ.रणजीतसिंह जाधव, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोशिएशन, सांगली शाखा 

महापालिका क्षेत्रातही हवी मुभा 

ग्रामिण क्षेत्रातील बांधकामे सुरु करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता तिथे कोणतीही अडचण येणार नाही. सर्वत्र ही कामे सुरु होतील. शहरांमध्ये जिथे बांधकाम साईटवर कामगार राहण्यास आहेत. तेथील बांधकामे सुरु ठेवण्यास केंद्राने मुभा दिली आहे. राज्य शासनाने यातील संभ्रम दूर केला पाहिजे. महानगरांमध्ये हा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. सांगलीसारख्या शहरांमध्ये साईटमध्ये कामगार राहत नाहीत. मात्र सर्व स्थानिक कामगार आहेत त्यामुळे त्यांच्या वाहतुकीचा फारसा प्रश्‍न येणार नाही. राज्य शासनाने त्यादृष्टीने विचार व्हावा. सामासिक अंतरासह सर्व दक्षता घेऊन महापालिका क्षेत्रातील बांधकामांनाही आयुक्तांनी मुभा द्यायला हवी. सध्या सुमारे दोनशेंवर साईटची कामे सध्या ठप्प आहेत. सर्व प्रकारच्या मालवाहतुकीस मुभा दिली आहे. त्यामुळे बांधकामांना परवानगी देणे योग्य ठरेल. आमची ही भूमिका आम्ही आयुक्तांना निवेदनाद्वारे मांडली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. 

- रवींद्र खिलारे, अध्यक्ष, क्रेडाई सांगली शहर 

आरोग्य- रोजगारालाच प्राधान्य 

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना आणि राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या माहिती आधारे 20 एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व म्हणजे जवळपास दोन हजार लघुउद्योग सुरु होतील. इस्लामपूर वगळता कोठेही रुग्ण न आढळल्याने महापालिका क्षेत्रातील उद्योगही सुरु करण्यास हरकत नाही. टाळेबंदीतही स्थलांतर झाले नसल्याने कामगारांची अडचण नाही. आता माझे सर्व उद्योजकांना सांगणे आहे संकटाची घडी पाहता कोणालाही कामावरून कमी न करता सर्व पगार नियमित करा. कामगारांना जपणे हीच देशसेवा आहे. उद्योग सुरु करतानाही कामगारांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करू नका. आजारी-तापाची लक्षणे असलेल्या कामगारांना सक्तीची पगारी विश्रांती द्या. कामगार कामावर घेतानाच त्यांची लॉंग डिस्टन्स थर्मामीटरच्या सहाय्याने तपासणी करा. सर्व मशिन्स व परिसराचे सॅनिटायझेशन, स्वच्छता व औषध फवारणी करा. स्वच्छतागृहांचे हायजीन सांभाळा. कामगारांनी एकत्र जेवण करू नये; त्यांनी अन्नाची देवाणघेवाण करून नये याची दक्षता घ्या. यापुढे कोरोनाशी लढाई करीतच कारखाने सुरु ठेवायचे आहेत त्यासाठी योग्य तो सार्वजनिक वावर ठेवावा लागणार असून त्यादृष्टीने कामगारांना तयार करणे ही उद्योजकांचीही जबाबदारी आहे. 

-  संजय आराणके, अध्यक्ष, मिरज औद्योगिक वसाहत 

महामार्गांवरील "आरोग्य' सांभाळा 

सोमवारनंतर पुन्हा एकदा महामार्गांवर लाखो माल ट्रक उतरतील. त्याआधी गावोगावी अडकलेले ट्रकचे चालक मूळ वाहन तळापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना प्रवासास पोलिसांनी अडथळे करू नयेत. केवळ सांगली जिल्ह्यात आज नऊ हजारांवर वाहने थांबून आहेत. सांगलीतून मोठ्या प्रमाणात साखर, भाजीपाला, फळे आणि द्राक्ष, बेदाण्याची वाहतूक देशभर सुरु होईल.. त्याचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी वाहतूकदार संस्थेचे कार्यालय सुरु राहणे आणि तेथील सर्व कर्मचारी कामावर हजर होणे महत्वाचे आहे. त्यालाही मान्यता मिळावी. 
कोरोनाचे संकट यापुढे कायम असल्याने सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आम्ही मास्क, सॅनिटायझरची सक्ती केली आहे. बाहेरगावच्या चालकांना जेवण, औषधे, फवारणीसाठी औषधे महत्वाची आहेत. तीन महिन्याचे कर्जाचे हप्ते पुढे जावेत, व्याज माफ व्हावे, वर्षभराचा होम टॅक्‍स रद्द व्हावा. थर्ट पार्टी वीमा एक वर्षाची सूट मिळावी या मागण्या कायमच असतील. महामार्गावर यापुढे स्वच्छतागृह, सॅनिटायझरची व्यवस्था संबंधित टोल वसुलीधारक कंपन्यांनी करावी. वाहनाचे चालक, हेल्पर, लोडर, अनलोडर सारेच जीवावर उदार होऊन यापुढे काम करणार आहेत. देशभर जाणार आहेत. त्यांनाही पोलिस-वैद्यकांप्रमाणेच सन्मान मिळावा. त्याबरोबरच त्यांना त्यांच्यासाठीही जीवन विमा योजना शासनाने आणावी. 

- बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, जिल्हा वाहतूकदार संघटना. 

गुळ व हळदीचे सौदे तत्काळ 

लॉकडाऊनमुळे बाजार समितीची रोजची सुमारे 25 कोटीची उलाढाल ठप्प आहे. सध्या मार्केट यार्डात होलसेल किराणा दुकाने सुरू आहेत. तेथे योग्य अंतर ठेवून वावर सुरु केला आहे. कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील विक्रेत्यांची गर्दी टाळण्यासाठी सध्या संत निरंकारी मंडळाच्या जागेत तात्पुरती भाजीपाला विक्री सुरू केली आहे. फळ मार्केटमध्येही सामासिक अंतराबाबतसक्त सूचना दिल्या आहेत. तेथे आत-बाहेर जाणाऱ्या वाहनांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार दोन दिवसात सांगलीत गुळ व हळदीचे सौदे पहिल्या टप्प्यात सुरू केले जातील. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी घेतली जाईल. सुरक्षितपणे सौदे सुरू ठेवण्यावर भर राहील. ज्याचा माल असेल तोच पुढे येईल. तसेच खरेदीदार ठराविक अंतरावर रांगेत उभे केले जातील. हमाल पाटीमधून प्रत्येकाला माल दाखवेल अशी व्यवस्था केली जाईल. दुरूनच सौदे पार पाडले जातील. गुळ-हळदीच्या सौद्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बेदाणा सौदे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

- दिनकर पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com