Belgaum : शेतातील घरांमध्येही आता ‘प्रकाश’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

light

शेतातील घरांमध्येही आता ‘प्रकाश’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शेतकऱ्यांच्या शेतातील घरांमध्येही आता विजेचा दिवा पेटणार आहे. राज्य शासनाने शेतातील घरांसाठी ‘प्रकाश’ योजना राबविण्याचा विचार चालविला असून त्यासाठी सर्वेक्षण कार्य हाती घेण्याची सूचना शासनाने वीज वितरण कंपनीला केली आहे. प्रायोगिक पातळीवर हुबळी वीज वितरण कंपनी आणि गुलबर्गा वीज वितरण कंपनीकडून दोन जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. त्यानंतर पुढील वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत योजनेचा विस्तार केला जाणार आहे.

राज्यभरात सुमारे एक लाख घरे शेतात असल्याचा सरकारचा अंदाज आहे. त्यासाठी गुलबर्गा आणि हुबळी वीजपुरवठा कंपनीकडून प्रायोगिक पातळीवर दोन जिल्हे निवडले जाणार असून त्या ठिकाणी शेतातील घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. वीज पुरवठ्याचा मार्ग आणि या घरांना वीज पुरवठ्यासाठी लागणारा खर्च यांची माहिती जमा केली जाणार आहे. ही माहिती डिसेंबरअखेर ऊर्जा खात्याकडे पाठविली जाईल. यानंतर अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाणार आहे. कर्नाटक वीज नियंत्रण प्राधिकरणकडून मंजुरी मिळताच योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राज्यात शेतामध्ये असणाऱ्या घरात विषारी कीटक, साप यांचा त्रास शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. अशा ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री वीज मिळत नसल्यामुळे अभ्यासही करता येत नाही. त्यामुळे शेतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ही समस्या ओळखून शासनाने शेतातील घरांनाही वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतातील घरांना वीजपुरवठा न करण्याचे मुख्य कारण म्हणजे पंपसेटचा वापर ठरला आहे. शेतातील घरांना रात्री वीज दिल्यास त्याचा वापर ते शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी करतील, अशी शक्यता होती.

loading image
go to top