"पावट्या'ने गाठला दोनशेचा टप्पा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

वाळवा : कांदा, बटाटा आणि लसणाची महागाई कमी झाली म्हणून की काय ऐन हंगामात आज पावट्याने किलोमागे दोनशेचा टप्पा पार केला.

वाळवा : कांदा, बटाटा आणि लसणाची महागाई कमी झाली म्हणून की काय ऐन हंगामात आज पावट्याने किलोमागे दोनशेचा टप्पा पार केला. परवा मकर संक्रांतीला येथे पावटा शंभर ते 120 रूपये प्रति किलो होता. आवक समाधानकारक असूनही आज बाजारात पावटा दोनशे रुपयांनी वधारला. 

सामान्यपणे हंगामात पावटा 80 ते 100 च्या घरात दरवर्षी खेळतो. यंदा मात्र पावट्याने उच्चांक गाठला. त्यामुळे ग्राहकांचा पावटा खरेदीला थंडा प्रतिसाद मिळाला. बाजारात गवार प्रति किलो 120 रूपये होती. हिरव्या मिरचीचा दर किलोमागे विस रूपयांनी वाढला.

गेल्या आठवड्यात मिरची 40 रूपये प्रति किलो होती. बाजारात कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो प्रत्येकी 40 रूपये प्रति किलो आहेत. दोडका, हिरवा वाटाणा 60 रूपये, देशी वांगी 80 रूपये प्रति किलो होती. बाजारात आज पालेभाज्यांचा पूर आला होता. मेथी पेंडी पाच रूपयांना असूनही ग्राहकांनी पाठ फिरवली.

कोथिंबीर, चाकवत, पालक, शेपू भाज्यांची अवस्थाही अशीच होती. कांदा गेल्या पंधरवड्यात पन्नास रूपये, बटाटा 40 रूपये, लसूण दोनशे रुपये किलो दरावर स्थिर आहे. अजूनही कांदा बटाटा आणि लसणाची खरेदी करताना ग्राहक दहावेळा खालीवर पहात असल्याचे चित्र आहे.

बाजारात चिकन 180 रूपये, मटन 460 ते 480 रूपये प्रति किलो आहेत. आज पावट्याने थेट चिकनलाच आव्हान दिले. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी चिकन खरेदीला पसंती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lima beans crosses rs. 200 per kg. in market