या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार? आज आढावा बैठक

विष्णू मोहिते
Friday, 4 September 2020

सांगली जिल्ह्यात रुग्णांची संख्या दुपटीने वाढते आहे. महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे.

सांगली : जिल्ह्यात  रुग्णांची संख्या दुपटीने वाढते आहे. महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करावा काय? याबाबत पालकमंत्री जयंत पाटील उद्या ( ता. 4) जिल्हाधिकारी कार्यालयात दीड वाजता आढावा बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याने लॉकडाऊनबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या मर्यादीत होती. ऑगष्ट महिन्याला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दुपटीने वाढते आहे. जुलै अखेरीस महानगरपालिका, शहरी भागात आठ दिवसांचा लॉकडाऊन झाला होता, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर रुग्णसंख्येत भर पडली आहे.

जुलैतील लॉकडाऊनचा उपयोगच झाला नसल्याचे पालकमंत्र्यांनीही स्पष्ट केले होते. जिल्ह्यात गत आठवडयात आठ हजार नमुने घेण्यात आले होते. पॉझिटीव्हीटी रेट 16.25 असून मृत्यू रेट 4.10, रिकव्हरी रेट 60.38 तर डब्लींग रेट 20.1 असा राहिला आहे. यामध्ये 20 ते 50 वयोगटातील नागरिक जास्त प्रभावीत असून 50 ते 80 वयोगटातील लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. 

कोरोना रुग्णांची गेल्या महिन्यातील रुग्णसंख्या पाहिली तर सप्टेंबरच्या प्रारंभीच तिपटीने वाढली आहे. गेल्या तीन दिवसात अडीच हजार रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण चौदा हजारावर गेले आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र व्हेंटीलेटर, ऑक्‍सीजनचे बेड अपुरे पडत आहेत. रुग्णांना सात-सात तास हॉस्पिटलमध्ये दाखलही करुन घेतले जात नाही. बहुतांशी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यात जावून दोन दिवसांपासून आढावा बैठका घेवून कोरोनाबाबतचे नियोजन आणि उपाययोजनांची माहिती घेत आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown again in Sangali district? Review meeting today