esakal | लॉकडाउनचा फटका : निर्यातक्षम द्राक्षांचेही होणार बेदाणे

बोलून बातमी शोधा

 Lockdown effect : Export quality grapes sent to prepare raisin

वर्षभर राबराब राबून पिकवलेल्या द्राक्षाची माती व्हायची वेळ आलीय. वर्षभर अभ्यास करून शेवटी परीक्षेवेळी घोळ झाल्यासारखी अवस्था यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. 

लॉकडाउनचा फटका : निर्यातक्षम द्राक्षांचेही होणार बेदाणे

sakal_logo
By
अजित कुलकर्णी

सांगली : द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच कोरोनाचा जोर वाढला. वर्षभर राबराब राबून पिकवलेल्या द्राक्षाची माती व्हायची वेळ आलीय. व्यापारी फिरकायला तयार नाहीत. बेदाणा करायचा म्हटला तर त्यासाठीच्या मालाचे दर भडकले आहेत. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून शेवटी परीक्षेवेळी घोळ झाल्यासारखी अवस्था यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

कोरोना विषाणूने अवघे जग भयभीत झालेय. इकडे शेतशिवारालाही कोरोनाचा जबर फटका बसला आहे. प्रामुख्याने खानापूर, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, मिरज तालुक्‍यातील कॅश क्रॉप असणारे द्राक्ष पीक कोरोनाच्या सावटाखाली होरपळून गेले आहे. द्राक्ष शेतीत नवनवे प्रयोग करून जगभर सांगलीच्या द्राक्षांचा ब्रॅंड निर्माण करून तो रुजवण्यात इथल्या शेतकऱ्यांची एक पिढी खर्ची पडली.

मात्र गेल्या काही वर्षात दुष्काळ, पाणी टंचाई, अतिवृष्टी, प्रतिकूल हवामान, मजुरांचा तुटवडा, औषधांसह खतांचे गगनाला भिडलेले दर परिणामी वाढलेला उत्पादन खर्च यामुळे द्राक्षशेती परवडेनाशी बनत आहे. अनेक संकटांना तोंड देत पिकवलेली द्राक्षे आजवर जगाच्या कानाकोपऱ्यात जात होती. मात्र यंदा कोरोना विषाणुमुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवणारे शेतकरी अक्षरश: या साथीमुळे भरडले जात आहेत. 

प्रसंगी टॅंकरने पाणी घालून जगवलेल्या बागा प्रथम अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडल्या. त्यात आगाप छाटणी घेउन मार्केटिंगसाठी द्राक्षे तयार करणाऱ्या सुमारे 25 टक्‍के शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. डाउनीसह इतर रोगांचे आक्रमण इतके झपाट्याने झाले की, ते थोपवणे शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेले. उरल्यासुरल्या द्राक्षांचे निघालेले उत्पादन वर्षभर केलेल्या खर्चाच्या तुलनेत नगण्य होते.

मार्केटिंगसाठी तयार केलेली द्राक्षे बाजारात येताच पहिल्या टप्प्यात कोरोनाचे सावट असतानाही समाधानकारक दराने गेली. मात्र मागास छाटणी झालेल्या क्षेत्रातील माल 50 टक्‍केच्या पुढे शिल्लक होता. कोरोनामुळे बाजारपेठ ठप्प असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी गुणवत्तापूर्ण द्राक्षाचे दर पाडले. मात्र द्राक्ष हा नाशवंत माल असल्याने तो झाडावर अधिक काळ ठेवल्याने नुकसान होण्याची शक्‍यता ओळखून कवडीमोल किमतीला शेतकऱ्यांनी द्राक्षे विकली. 

लॉकडाऊनचा फटका बेदाणा निर्मितीलाही... 
मार्केटिंगसाठी माल तयार केलेल्या काही शेतकऱ्यांनी बेदाण्याचा पर्याय स्वीकारला. लॉकडाऊनमुळे बेदाणा निर्मितीसाठी लागणाऱ्या मालाचे दरही वाढले आहेत. पोटॅशियम कार्बोनेट, डिपिंग ऑईलसह पॅकिंगसाठी लागणाऱ्या बॉक्‍सचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दरवाढीचे आणखी नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे.