चहाप्रेमींनो आता तुमच्या चहाची टेस्ट बदलणार

Lockdown effect of heavy rains in Assam  but tea import  to India
Lockdown effect of heavy rains in Assam but tea import to India

सांगली : सकाळी उठल्यावर आधी हाती चहाचा कप लागतो. कडक, ताजा, लज्जतदार... ही विशेषणे लाभलेल्या चहाशिवाय आपले पान हलत नाही; मात्र यंदा या चहाची चव थोडी बदलू शकते. कारण भारतीयांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विदेशी चहा प्यावा लागणार आहे. कोरोना संकट काळात दीर्घकाळ लॉकडाउन आणि आसाममधीली अतिवृष्टी यामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच चहा आयात करण्याची वेळ आली आहे. 
त्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे आयातीला परवानगी मागण्यात आली आहे.

दरवर्षी सुमारे एक कोटी १० लाख क्विंटल चहाचे उत्पादन करणाऱ्या भारताचे यंदाचे चहाचे उत्पादन सुमारे २५ ते ३० कोटी किलो इतके घटले आहे. परिणामी, चहाच्या दरात किलोमागे ६० ते ८० रुपयांची वाढ झाली असून दिवाळीनंतर ती शंभर रुपयांच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. येथील जी. एस. चहा उद्योग समूहाचे संचालक राजेश शहा म्हणाले, ‘‘होय, चहा आयात करण्याची वेळ भारतावर इतिहासात पहिल्यांदाच आली आहे. या आधी देशातील एकूण मागणीच्या एक ते दोन टक्के चहा आयात व्हायचा आणि उत्पादनाच्या सुमारे २० टक्के निर्यात होत होती. यंदा निर्यातची शक्‍यता कमीच आहे आणि आयातीची गरज आहे.’’


देशातील ८० टक्के चहाचे उत्पादन आसाममध्ये होते. दक्षिण भारतातील कुन्नूरसह परिसरातील चहा मळ्यांतून सुमारे २० टक्‍क्‍यांपर्यंत चहा उत्पादित होतो. यंदा आसामच्या चहा मळ्यांवर दुहेरी संकट आले. पहिले संकट कोरोना महामारीच्या रुपाने आले. त्यावेळी निर्बंधांमुळे कामगारांना चहा मळ्यात जाता आले नाही. निर्बंधांची पूर्तता करेपर्यंत २१ दिवसांचा काळ निघून गेला. तो फटका प्रचंड मोठा होता. त्यातून सावरायची धडपड सुरू असतानाच आसाममध्ये वादळाचा फटका बसला, अतिवृष्टी झाली.

परिणामी, पंधरा दिवस वाहतूक आणि तोडी बंद राहिले. जून-जुलै गुणवत्तापूर्ण चहा पिकण्याचे अत्यंत महत्त्वाचे महिने. त्यातच फटका बसल्याने दर्जेदार चहा हाती कमी आला, शिवाय उत्पादनात घट झाली. सुदैवाने दक्षिण भारतात ही समस्या आली नाही; मात्र देशातील उत्पादनाच्या तुलनेत तो टक्का खूप कमी आहे. या स्थितीत चहाचे दर किमान पुढील हंगामापर्यंत वाढत राहणार हे स्पष्ट आहे.  

आज घडीला किरकोळ बाजारात प्रतिकिलो चहाचा दर ६० रुपयांनी वाढवला आहे. अधिक चांगल्या दर्जाच्या चहाच्या दरात ८० रुपयांची वाढ झालेली आहे. भविष्यात ती 
आणखी होईल, यात शंका नाही. २० लाख क्विंटल चहा निर्यात करणाऱ्या भारतात आता तेवढाच चहा आयात करावा लागेल, अशी परिस्थिती आहे.
- राजेश शहा, व्यापारी


कुठून आयात होणार?
आफ्रिका खंडातील केनिया, युगांडा, रवांडा या देशांत 
चहाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत. तेथूनच भारताला आयात 
करावी लागेल. तेथील चहा उत्पादन दर्जेदार आहे; मात्र रंग आणि चव या पातळीवर 
भारतीय चहा कधीही उजवा आहे, असे श्री. राजेश शहा यांनी स्पष्ट केले. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com