Loksabha 2019 : ही निवडणूक गुलामगिरीतून सुटण्याची संधी - आंबेडकर

Loksabha 2019 : ही निवडणूक गुलामगिरीतून सुटण्याची संधी - आंबेडकर

कोल्हापूर - ‘‘निवडणुकीत कोण तरी पैसा गुंतवते. ते वसूल करण्यासाठी पुढे सरकारी तिजोरी लुटली जाते. कंत्राटी पद्धतीत शोषण होते. कंत्राटी काम म्हणजे मनुवाद्यांची गुलामगिरी आहे. भांडवलदारांचा तो कैदखाना आहे, त्यातून सुटण्यासाठी कंत्राटीनी वंचित बहुजन आघाडी सोबत यावे, आमची सत्ता आल्यानंतर त्यांना गुलामगिरीतून मुक्त करू. त्यामुळे गुलामगिरीतून सुटण्याची संधी म्हणून या निवडणुकीकडे पहा.’’ असे आवाहन  आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. अरुणा गवळी यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते.

श्री. आंबेडकर म्हणाले,  कोल्हापूरचे राजकारण धनदांडग्यांचे आहे. नगरसेवकापासून लोकसभेपर्यंत करोडोंचा चुराडा होतो. तोच पैसा वसुलीसाठी सरकारी तिजोरी लुटली जाते. हे सरकार लुटारू, डाकूंचे आहे. ही स्थिती थांबवण्यासाठी गोरगरीब जनताही निवडणूक लढवत आहे. ती जिंकू शकते हेच दाखवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या.’’ 

संघावर गुन्हा का नाही 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर बंदुका, शस्त्रे आहेत आणि इथे साधी तलवार सापडली तरी गंभीर गुन्हे नोंदवतात. संघावर गुन्हा दाखल होत नाही, असा प्रश्‍न ॲड. आंबेडकर यांनी विचारला.

उमेदवार डॉ. अरुणा माळी म्हणाल्या, ‘‘बहुजन व वंचितांचा आक्रोशाला वाट करून देण्याचे काम ॲड. आंबेडकर यांनी केले आहे. जे भाजप सरकार संविधान बदलण्याची भाषा करते, पंधरा लाख आदिवासी बेघर झाले तेव्हा भाजप कुठे गेले होते, धनगर, मराठा समाज, भटके विमुक्त रोजगार व आरक्षणाचा हक्क मागतात, त्यांचे भाजपने काय केले. शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यावर शिवसेनेची भूमिका काय, याचे उत्तर द्यावे.’’ लक्ष्मण माने यांचेही भाषण झाले.

समीर खेडेकर, शिवानंद हैबतपुरे, बबन कावडे, सोहेल शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजनचे उमेदवार अस्लम सय्यद उपस्थित होते.

लढाई आमची आम्हीच जिंकणार 
प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, ‘‘ही निवडणूक आपल्या जीवनमरणाची आणि अस्तित्वाची लढाई आहे. आपण झोपलो आहोत, म्हणूनच संविधान जाळण्याचे प्रयत्न होतात. साधू महाराजांना उमेदवारी देता तर त्यांनी संसदेत जाऊन काय टाळ वाजवायचे आहेत. ही आघाडी कोणत्याही जातीची नाही. धनगर समाजाला आम्ही सात जागा दिल्या. मातंग समाजाला तीन जागा दिल्या. पुलवामा हल्ल्यानंतर ज्या पाकिस्तानला बेचिराख व्हायला हवे होते तसे न करता त्यांच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण करून सैनिकांचा अपमान केला. तुमच्यात खरेच जर देशभक्ती भरली असेल तर सशस्त्र संचलन का करता? ही आमची लढाई आहे आणि ती आम्हीच जिंकणार आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com