Loksabha 2019 : सर्वच पक्षांना घराणेशाहीची लागण

निवास चौगले 
रविवार, 31 मार्च 2019

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देतानाही राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्यांनाच उमेदवारी दिली आहे. 

भाजपने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे, माजी मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हीना गावित, दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे, दिवंगत नेते कै. प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देऊन आपणही घराणेशाहीचे पुरस्कर्ते आहोत, हे दाखवून दिले आहे. 

भाजपसोबत आघाडीत सहभागी असलेले ‘रासप’चे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी सौ. कांचन या इतर पक्षातील लोकांना उमेदवारी देताना घराणेशाही बघितली आहे. सौ. कुल यासुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नातलग आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा या सौ. कुल यांच्या आत्या आहेत. सौ. कुल या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघातून लढणार आहेत; तर डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिणमधून रिंगणात उतरले आहेत. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी तर आपल्या घरातच दोघांना उमेदवारी दिली आहे. त्यात पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना मावळमधून, तर खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीतून रिंगणात उतरले आहे. याशिवाय पार्थ यांचे मामे भाऊ व अजित पवार यांचे मेहुणे पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांना उस्मानाबादमधून उमेदवारी दिली आहे.

राणा जगजितसिंह यांचे विरोधक ओमराजे निंबाळकर हेही माजी आमदार पुत्र व श्री. पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. अनेक दिवस चर्चेत असलेल्या माढा मतदारसंघातही घराणेशाही जपताना राष्ट्रवादीने आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू व जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. 

काँग्रेसने माजी खासदार व दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची कन्या व माजी खासदार प्रिया दत्त, माजी खासदार मुरली देवरा यांचे पुत्र खासदार मिलिंद देवरा, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल, गुरुदास कामत यांचा मुलगा या राजकीय वारसदारांनाच उमेदवारी दिली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. या जागेसाठी  अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांचे नाव चर्चेत होते.

शिवसेनेकडून राज्यातील इतर मतदारसंघांत पक्षाच्या निष्ठावंतांबरोबरच विद्यमान खासदारांनाच संधी दिली आहे. त्यातही कोल्हापूरच्या दोन जागांचा अपवाद आहे. या दोन्हीही जागांवर माजी खासदार पुत्रांना रिंगणात उतरवून आम्हीही घराणेशाही मागे नाही, हेच दाखवून दिले आहे. सेनेने कोल्हापुरातून दिवंगत माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र प्रा. संजय यांना, तर हातकणंगलेतून राष्ट्रवादीच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील यांना उमेदवारी दिली आहे.

जावयांसाठी सासरे रुसले
माढातून भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन यांना रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू होत्या. रोहन हे भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार संजय काकडे यांचे जावई. काकडे हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार होते; पण त्यांचे बंड थंड करताना जावई रोहन यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला. पण शेवटी भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली.

वडील काँग्रेसमध्ये, मुलगा भाजपात
याशिवाय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांना नगरमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. डॉ. विखे-पाटील अजून काँग्रेसमध्येच आहेत; पण मुलाला मात्र त्यांनी भाजपात पाठवून उमेदवारी मिळवली आहे. 

भाजपच्या आमदारांचे जावईही रिंगणात
भाजपचे नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधातही राष्ट्रवादीने भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे जावई व आमदार अरुण जगताप यांचे पुत्र संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. सासरे भाजपचे आमदार आणि जावई राष्ट्रवादीचे उमेदवार असा रंजक सामना येथे पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरातही घराणेशाही
कोल्हापुरात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. महाडिक हे काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत, तर त्यांचे चुलत बंधू अमल महाडिक भाजपचे आमदार आहेत. यानिमित्ताने कोल्हापुरातही घराणेशाहीची परंपरा असल्याचे पाहावयास मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 All parties have access to family dynamics