Loksabha 2019 : देश महासत्ता होण्यासाठी मोदींना आणखी एक संधी द्या - अमित शहा

रवींद्र माने 
बुधवार, 17 एप्रिल 2019

काश्मीर एकसंघ राहिला पाहिजे, आज काश्मीरला वेगळा पंतप्रधान हवा, अशी भूमिका घेतली जात आहे. त्यावर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. पण ते गप्प का? 

तासगाव - देशाच्या सुरक्षेस आमचे प्रथम प्राधान्य आहे. कर्तव्य आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरे कोणीही हे करू शकत नाही. देश महासता होण्यासाठी मोदी यांना आणखी एक संधी द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. 

सांगलीतील भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी श्री. शहा तासगावात आले होते. श्री. शहा म्हणाले, अगर ओ गोली दागेगे तो हम बम बरसायएंगे ! इट का जबाब पथरसे देंगे !  भारत देश आता शत्रू राष्ट्रात घसून हल्ला करणाऱ्या अमेरिका आणि इस्राईलच्या रांगेत तिसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे. जग आता भारत देशाकडे सन्मानाने बघत आहे. देश नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे, 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात देश आणि राज्य सुरक्षित राहू शकत नाही. मोदींना पुन्हा पंतप्रधान करा. देशातील एकूण एक घुसखोर शोधून हाकलून देऊ

- अमित शहा 

श्री. शहा यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला, तसेच शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात शरद पवार आणि कंपनीने जलसिंचन योजनांसाठी खर्च केलेल्या ७२ हजार कोटींचा हिशोब जनतेला द्यावा, असे आवाहनही केले.

काँग्रेसच्या काळात पंधरा लाख करोड रुपयांचे घोटाळे झाले. मोदींच्या पाच वर्षात एक रुपयांचा घोटाळा झाला नाही. राहुल गांधी आणि शरद पवारांच्या भाषणात गरीबांची आठवण येते. पण त्यांनी गरीबांसाठी काय केले. पाच पाच पिढ्या राज्य केले पण गरीबांसाठी काय केले, असा सवालही शहा म्हणाले.

आम्ही घुसखोरीवर बोलतो तेव्हाच राहुल गांधी संसदेत घुसखोरांच्या मानवाधिकारावर बोलतात. घुसखोरांमुळे देशातील नागरिक मरतात. त्यावेळी देशातील नागरिकांच्या मानवाधिकाराचे काय हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारा.

- अमित शहा

काश्मीर एकसंघ राहिला पाहिजे, आज काश्मीरला वेगळा पंतप्रधान हवा, अशी भूमिका घेतली जात आहे. त्यावर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. पण ते गप्प का? असा प्रश्न श्री. शहा यांनी विचारला.

सभेसाठी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Loksabha 2019 Amit Shah comment in Tasgaon