Loksabha 2019 : 40 वर्षांत 32 निवडणूका लढलेले भाई यंदा मात्र मैदानाबाहेर

दत्तात्रय वारके
बुधवार, 17 एप्रिल 2019

गेल्या ४० वर्षांच्या काळात ग्रामपंचायत ते लोकसभा अशा ३२ निवडणुका लढवल्या आहेत. सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही मी केली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी ही निवडणूक लढवू शकत नाही. मात्र, सहा महिन्यांनंतर होणारी विधानसभा आणि त्यापुढील काळात सर्वच निवडणुका लढवण्याची माझी इच्छा आहे. 
- भाई पी. टी. चौगले

निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे.

वयाच्या ३० व्या वर्षी १९९० साली भाईंनी प्रथमच बोरवडे गावची ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर १९९२ साली शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांनी कागल पंचायत समितीच्या बोरवडे मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळी कोणताही राजकीय पाठिंबा नसतानाही त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांशी चांगली लढत दिली. परंतु, त्यांचा केवळ सहा मतांनी पराभव झाला.

भाईंचा स्वभावच लढण्याचा असल्याने त्यांनी त्या पुढील काळात सलग आठ वेळा पंचायत समिती, आठ वेळा जिल्हा परिषद, आठ वेळा विधानसभा, तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा बिद्री साखर कारखान्याची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. यामध्ये त्यांना एकदाही यश मिळाले नसले तरी त्यांनी नाउमेद न होता गेली ४० वर्षे  प्रत्येक निवडणुकीत आपली उमेदवारी कायम ठेवली.

भाईंनी एकदा उमेदवारी अर्ज भरला की ते एकटेच प्रचाराला बाहेर पडायचे. कधी पायी चालत तर कधी एसटीने प्रवास करत ते आपला प्रचार स्वतःच करायचे. पुढील काही निवडणुकीवेळी ते भाड्याने जीप गाडी घेऊन प्रचार करू लागले. एखाद्या गावात गेल्यावर गावच्या चौकातच गाडी थांबवून ते गाडीच्या बोनेटवर उभा राहून गाडीला जोडलेल्या स्पिकरवरुन भाषण द्यायचे. यावेळी समोर असतील तेवढ्या मतदारांच्यासमोर ते आपली भूमिका मांडायचे आणि मग पुढील गावाकडे मार्गस्थ व्हायचे, अशी त्यांची प्रचाराची पद्धत होती.

राजकारणासोबतच भाईंनी समाजकारणातून गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावेत म्हणून सातत्याने प्रयत्न केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात त्यांच्या प्रयत्नांतून हजारो रुग्णांवर उपचार झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा असतील, अशा ठिकाणी स्वतःहून बक्षीस देतात. शिंदेवाडी (ता. कागल) येथे दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी महिला गटाच्या प्रथम क्रमांकासाठी त्यांनी आजअखेर बक्षीस देऊ केले आहे. यामध्ये ११ हजार रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांच्या बक्षिसांची ही रक्कम आहे.

घरची गरीब परिस्थिती, उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसताना त्यांनी समाजासाठी केलेले दातृत्व असामान्य आहे. त्यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने २०१५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना नवी दिल्ली येथे भारतज्योती ॲवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे.

गेल्या ४० वर्षांच्या काळात ग्रामपंचायत ते लोकसभा अशा ३२ निवडणुका लढवल्या आहेत. सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही मी केली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी ही निवडणूक लढवू शकत नाही. मात्र, सहा महिन्यांनंतर होणारी विधानसभा आणि त्यापुढील काळात सर्वच निवडणुका लढवण्याची माझी इच्छा आहे. 
- भाई पी. टी. चौगले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Bhai fights 32 elections in 40 years, but this time out of field