Loksabha 2019 : नरके काका-पुतण्यात हातघाई

युवराज पाटील
सोमवार, 8 एप्रिल 2019

दृष्टिक्षेपात राजकारण

  •  अरुण नरके दूध संघात महाडिक यांच्यासोबत, विधानसभेवेळी पुतण्यासोबत 
  •  पाटपन्हाळा, बाजार भोगाव, कळे परिसरात नरके यांना मानणारा गट 
  •  काकांचे पुतण्या विरोधात भूमिकेचे पडसाद कसे उमटतात ते निकालावेळीच स्पष्ट होणार

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत करवीर विधानसभा मतदारसंघात विचित्र चित्र अनुभवायला मिळते आहे. जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या बाजूने, तर आमदार चंद्रदीप नरके महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. या सर्व गदारोळात ‘करवीर’मधून महाडिक की मंडलिक यांना मताधिक्‍य मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांना या विधानसभा मतदारसंघातून ३३ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या निवडणुकीत आमदार नरके यांच्यावर मंडलिक यांना मताधिक्‍याची जबाबदारी सोपवली आहे. त्याचवेळी जिल्हा दूध संघात गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध असलेल्या अरुण नरके यांनी महाडिक यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामागे महादेवराव महाडिक यांच्याशी असलेले संबंध कारणीभूत आहेत. 

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अरुण नरके हे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी राहिले. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याविरोधात नरके यांनी दोन वेळा निवडणूक लढवली. अरुण नरके दूध संघात महाडिक यांच्यासोबत विधानसभेवेळी पुतण्यासोबत उभे राहिले. या निवडणुकीतही त्यांनी अशीच संभ्रमावस्था करून ठेवली आहे.

आमदार नरके मंडलिकांच्या प्रचाराला लागले असताना अरुण नरके मात्र उघडपणे महाडिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांचा पी. एन. पाटील यांना कायम विरोध राहिला आहे. मात्र, दूध संघात ते एकत्र आहेत. 

मल्टिस्टेटच्या मुद्यावरून आमदार नरके यांनी विरोधी भूमिका घेऊन गोकुळच्या सर्वसाधारण सभेत सर्वांचे लक्ष वेधले. त्यावेळी पी. एन. पाटील व अरुण नरके मल्टिस्टेटच्या बाजूने होते. अलीकडेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जिल्हा दूध संघाच्या सभेत चंद्रदीप गोकुळच्या सभेत जसे नाचले, त्याचा धडा त्यांना विधानसभा निवडणुकीत देऊ, असे सांगितले होते. 

त्यानंतर अरुण नरके यांनी धनंजय महाडिक यांच्या पाठीशी राहणार असल्याचे म्हटले होते. सुरवातीला त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. मात्र, आता ते उघडपणे प्रचारात उतरले आहेत. 
पाटपन्हाळा, बाजार भोगाव, कळे या परिसरात त्यांना मानणारा गट आहे. चंद्रदीप नरके रात्रीचा दिवस करून आपली भावी आमदारकी टिकवण्यासाठी धडपडत असताना काका अरुण नरके यांनी मात्र विरोधी भूमिका घेतली आहे.

शिवसेनेच्या अलीकडेच झालेल्या मेळाव्यात चंद्रदीप नरके यांनी आपण पक्षासाठी भावाचाही (संदीप नरके) जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव केला असल्याचे म्हटले होते. आपल्याकडे कुणी बोट दाखवू नये, असेही त्यांनी आवाहन केले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मात्र काकांनी पुतण्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद कसे उमटतात हे २३ मे रोजी होणाऱ्या निकालावेळीच स्पष्ट होणार आहे.

दृष्टिक्षेपात राजकारण

  • अरुण नरके दूध संघात महाडिक यांच्यासोबत, विधानसभेवेळी पुतण्यासोबत 
  • पाटपन्हाळा, बाजार भोगाव, कळे परिसरात नरके यांना मानणारा गट 
  • काकांचे पुतण्या विरोधात भूमिकेचे पडसाद कसे उमटतात ते निकालावेळीच स्पष्ट होणार
Web Title: Loksabha 2019 Chandradeep and Arun Narake Face-to-face