Loksabha 2019 : गर्दीचे मतांत रूपांतर करण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान

Loksabha 2019 : गर्दीचे मतांत रूपांतर करण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान

लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ बुधवारी गांधी मैदानात विराट सभा झाली. सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व उमेदवार असलेल्या महाडिकांनी तडाखेबाज भाषणं करीत कार्यकर्त्यांना चार्ज केले. आघाडीच्या प्रचाराची मरगळ दूर करण्याचे काम या सभेने केले; मात्र हे वातावरण मतदानापर्यंत टिकवणे हेच मोठे आव्हान राष्ट्रवादीला पेलावे लागणार आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आघाडी-युतीत सुरू असलेली लढत भाकीत करण्याच्या पुढे गेली आहे. या मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक विरुद्ध प्रा. संजय मंडलिक यांच्यातच लढत होणार, हे निश्‍चित होते; मात्र या दोघांच्या पक्षाबाबत उलटसुलटच चर्चा होती.

दीड महिन्यापूर्वी महाडिक यांच्या बाजूनेच फासे पडत असल्याचे चित्र होते; मात्र एकाएकी हे चित्र बदलत गेले. महाडिक यांना राष्ट्रवादीतूनच लढावे लागणार, हे निश्‍चित झाल्यानंतर मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा व मित्रपक्षांचा शोध सुरू झाला. पक्षाअंतर्गत असलेला विरोध लक्षात घेता किती लोकांची समजूत काढणार, किती लोकांची मनधरणी करणार, किती लोकांवर पक्षाचा दबाव टाकणार? असे एक ना अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. 

महाडिक यांना मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तर सरळ विरोध करत आव्हान दिले. या सर्व घडामोडींत राष्ट्रवादीची जागा अडचणीत येऊ लागल्याचे दिसू लागल्यानंतर दस्तुरखुद्द खासदार शरद पवार यांनी यात लक्ष घातले. गेल्या २० वर्षांत म्हणजेच पक्षाच्या स्थापनेपासून खासदार पवार यांनी पाच वेळा कधी कोल्हापूरचा दौरा केला नाही. यावेळी मात्र त्यांचा तीन वेळा दौरा झाला. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी व प्रमुख कार्यकर्त्यांनी गांधी मैदानातील सभेसाठी जय्यत तयारी करत सभा यशस्वी करून दाखवली.

खासदार शरद पवार यांनीही विरोध करणाऱ्यांना दुर्लक्षाने मारत देशपातळीवरील राजकारणाची सुरू असलेली वाटचाल, सर्वसामान्य लोकांची होत असलेली दिशाभूल, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आदी विषयांना हात घातला. तसेच समस्या सोडवण्यासाठी धनंजय महाडिकांसारखा बंदा रुपया पाठवा, असे सांगत केलेले आवाहन सभेला उपस्थित असणाऱ्यांना चांगलेच भावले.

तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शासनाकडून सुरू असलेली धूळफेक पॉवरपॉइंटच्या माध्यमातून दाखवत लोकांच्या स्मरणशक्‍तीला ताण देण्याचा आगळावेगळा प्रयोग केला. धनंजय महाडिक यांनीही व्यक्‍तिगत टीकेला फार महत्त्व न देता कामाचा आलेख मांडत निवडून देण्याचे आवाहन केले. एकूणच या सभेने कार्यकर्त्यांत नवचैतन्य आणले. आता प्रश्‍न आहे तो सभेच्या वातावरणाचा लाभ घेण्याचा.

‘सकाळ’चा जाहीरनामा पवारांकडे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने लोकांच्या जनतेतून लोकसभेचा जाहीरनामा तयार केला होता. या जाहीरनाम्यात विविध १६ घटकांतील तज्ज्ञांची मते घेण्यात आली. हा जाहीरनामा बुधवारी (ता. १७) राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी हा जाहीरनामा श्री. पवार यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com