Loksabha 2019 : राजकीय विद्यापीठाचा ‘अंडरकरंट’ कळेना

निवास चौगले
शनिवार, 20 एप्रिल 2019

कागल हे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ. इथे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व. एवढेच नव्हे, तर काही घरांचीसुद्धा ओळख अमुक एका गटाचे, तमुक एका गटाचे अशी. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा हा तालुका. या तालुक्‍यातील एक सुपुत्र लोकसभेच्या रिंगणात; पण तालुक्‍यात मात्र भयाण शांतता. कुठे प्रचार दिसेना की तसे वातावरण.

कागल हे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ. इथे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व. एवढेच नव्हे, तर काही घरांचीसुद्धा ओळख अमुक एका गटाचे, तमुक एका गटाचे अशी. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा हा तालुका. या तालुक्‍यातील एक सुपुत्र लोकसभेच्या रिंगणात; पण तालुक्‍यात मात्र भयाण शांतता. कुठे प्रचार दिसेना की तसे वातावरण. गावाच्या पारावर बसलेल्या लोकांना बोलते केले तर त्यातून येणाऱ्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या. त्यामुळे या तालुक्‍याचा ‘अंडरकरंट’ काय असेल, हेच कळायला मार्ग नाही.

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीपासून ते राधानगरी तालुक्‍याच्या सीमेपर्यंत आणि इस्पुर्लीपासून ते आजरा तालुक्‍याच्या सीमेपर्यंत असा विस्तीर्ण तालुका. विधानसभेसह कागल नगरपालिका आणि पंचायत समितीतही राष्ट्रवादीचे वर्चस्व. गेली २० वर्षे आमदार हसन मुश्रीफ या तालुक्‍याचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे आमदार म्हणून करतात. पण या तालुक्तात मुश्रीफ, मंडलिक, संजयबाबा आणि राजे असे चारही गट प्रबळ. सहकारी बॅंका, दूध संस्था, पतसंस्था, साखर कारखाने, पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गटाने तालुक्‍यात आपले बस्तान बसवले आहे. प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात या गटांचे अस्तित्व शंभर टक्के दिसणारच. पण गेल्या चार-पाच वर्षांपासून काही गावांतील ग्रामपंचायतीत यापैकी दोन गटांची एकत्रित सत्ता आहे. ज्या गावात यापूर्वी गटातटाच्या राजकारणातून हाणामारी, रक्तपात झाला, त्या गावात मात्र टोकाचा संघर्ष, ही या तालुक्‍याची ओळख आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज कागल तालुक्‍याचा दौरा केला. पहिली भेट दिली मौजे सांगावला. पण तिथे शांतता. तेथून रणदिवेवाडी या छोट्या गावात गेलो तर तिथे निवडणूक आहे का नाही अशी स्थिती. पुन्हा मौजे सांगाव येथे परत आल्यानंतर राष्ट्रवादीची पदयात्रा निघाली होती. जेमतेम लोक होते. घरोघरी जाऊन प्रचार पत्रके कार्यकर्ते देत होते. तेथून बस स्टॅंडवर येऊन लोकांशी गप्पा मारल्या तर ‘अजून काय वातावरण नाही ओ, पाणी अजून चढतंय, उतरतंय’, ‘तालुक्‍याचा उमेदवार आहे पण... लोकांचा सूर वेगळाच आहे,’ असा सूर ऐकायला मिळाला. ‘विधानसभेला साहेबच (मुश्रीफ); पण आता बघू..’ अशाही भावना कार्यकर्त्यांच्या आहेत.

कसबा सांगाव हे मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांचे गाव. पण या गावातही प्रचार दिसेना. तेथून कागलमध्ये आलो तर उपनगरात प्रा. मंडलिक यांचे कार्यकर्ते ‘घर टू घर’ प्रचार करताना दिसले. प्रा. मंडलिक यांची प्रचार पत्रके घरोघरी देणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र ‘भूमिपुत्राच्या मागेच तालुका राहील,’ अशा भावना व्यक्त केल्या. 

कागलमार्गे सिद्धनेर्ली, खेबवडेतून बाचणी, केंबळी, बिद्री या मार्गावरील तालुक्‍यातील गावांतही शांतताच. दुपारच्या वेळी शेतात राबणारे शेतकरी, वैरण घेऊन घरी चाललेल्या महिला आणि घरासमोरच्या गोठ्यात सायंकाळच्या तयारीत गुंतलेले काही हात एवढेच चित्र पाहायला मिळाले. मुरगूड हे या तालुक्‍यातील मोठे गाव; पण तिथेही फारसे वातावरण नव्हते. विशेष म्हणजे या संपूर्ण तालुक्‍याचा दौरा करताना एकही प्रचाराचे वाहन थांबलेले किंवा रस्त्यावर दिसले नाही.

यापूर्वीच्या निवडणुकांचा अंदाज पाहता ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यात एवढी शांतता पाहायला मिळाली. दुपारी तर आग ओकणारा सूर्य डोक्‍यावर. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हात प्रचार करणारे कार्यकर्तेच रस्त्यावर दिसले नाहीत तर मतदार कोठे शोधायचा, असा प्रश्‍न पडण्यासारखी स्थिती होती. सायंकाळनंतर मात्र प्रचाराचे वातावरण दिसते, असे सुळकूडमधील ग्रामस्थांनी सांगितले.

ही संपूर्ण शांतता पाहता या तालुक्‍यात ‘अंडरकरंट’ मात्र कळायला मार्ग नाही. जशी मुश्रीफ यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे तशीच प्रा. मंडलिक यांच्यासाठी एकत्र आलेल्या दोन्हीही घाटगे गटांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

बिळात पाणी गेल्यानंतर उंदीर एकटाच 
‘‘इथं पाणी जरा चढतंय आणि उतरतंय, त्यामुळे काय सांगता येत नाही. हे बघा, सुगीच्या काळात उंदराला बायका जास्त; पण बिळात पाणी गेल्यानंतर उंदीर एकटाच असतो,’’ अशी बोलकी प्रतिक्रिया मौजे सांगाव येथील रावसाहेब आंबी यांनी व्यक्त केली. आंबी हे मूळव्याधीवर आयुर्वेदिक औषध देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. गावाच्या बसस्टॉपवरच त्यांचा दिवसभर मुक्काम हा ठरलेला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ground report Kagal Taluka