Loksabha 2019 : कोण शेट्टी, कोण माने, आम्‍हाला ठावं नाय!

शिवाजी यादव 
शनिवार, 20 एप्रिल 2019

मतदानाला अवघे चार दिवस असताना वाडीवस्तीवरील लोकांना उमेदवारांची नावे माहीत नाहीत. हे गंभीर वास्तव शाहूवाडी तालुक्‍यातील अनेक धनगरवाड्या तसेच वस्त्यांवर आज अनुभवास आले.  

लोकसभा निवडणुका होणार आहेत? ‘होय माहीत आहे की’, उमेदवार कोणकोणत्या पक्षाचा आहे माहिती आहे का? ... ‘नाही’. राजू शेट्टी, धैर्यशील माने यांच्याकडून कोणी आले होते काय? ‘नाही, आम्हाला शेट्टी पण माहिती नाही आणि माने पण.’ मतदान करणार काय? ‘होय करणार की’, उमेदवार माहिती नाही म्हणता तर मतदान कसे करणार? शित्तूर वारुणची माणसं सांगत्यात तेव्हा करणार. मतदानाला अवघे चार दिवस असताना वाडीवस्तीवरील लोकांना उमेदवारांची नावे माहीत नाहीत. हे गंभीर वास्तव शाहूवाडी तालुक्‍यातील अनेक धनगरवाड्या तसेच वस्त्यांवर आज अनुभवास आले.  

शाहूवाडी तालुक्‍यातील शित्तूर वारुणचा डोंगर घाट चढून वर गेले की, दगड-गोटे, झाडा-झुडपांचा फोंडा माळ दिसतो. वस्ती दिसत नाही पण मळलेल्या वाटेवरून अंदाज घेत चार-पाच किलोमीटर खाच खळग्यातून आत गेले की, लागते ती ‘ढवळेवाडी वस्ती’ त्याच्यापुढील एक किलोमीटर पुढे गेले की बाजूस लागतो तो, ‘विठ्ठलाई धनगरवाडा’ या दोन्ही ठिकाणी असूनही लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सोडा पण नेते, पक्षीय कार्यकर्ते किंवा कोण अपक्ष उमेदवार अद्यापही पोचलेला नसल्याचे या वस्तीवरील लोकांनी सांगितले.  

ढवळेवाडीतील ग्रामस्थांना निवडणुकीविषयी काय वाटते? एवढाच प्रश्‍न विचारला त्यावर ग्रामस्थांनी दिलेली माहिती केंद्र सरकार असो वा राज्य सरकारच्या सर्व योजनांचा धुव्वा उडविणारी आहे. 

गावात शाळा चौथीपर्यंत आहे, तेथून पुढे शाळा शिकायची तर दिलेली माहिती पाच-सहा किलोमीटर रोज चालत जावे लागते. गावात एसटी येत नाही. बाहेर गावांचा संबध नाही, कोणाची तब्येत बिघडली तर पाळणा करून चादरीची झोळी करून शित्तूरपर्यंत चालत रुग्णाला न्यावे लागते. तेथून मिळेल त्या वाहनाने पुढे दवाखान्यात न्यावे लागते,  रोजगार नाही, जनावरांचे दूध आणि पावसात पिकेल तेवढी शेती.

काहीजण मुंबईत कामाला जातात. येथे समस्या एवढ्या आहेत की, तुम्ही ज्यांना मतदान केले त्यांना समस्या सांगितल्या का? ‘होय सांगितल्या’ तेव्हा आमदार सत्यजित पाटील एक-दोन वेळा येऊन गेले कूपनलिका खोदून दिली, असे ग्रामस्थांनी सांगितले.

मतदानाला कुठे जाता? हे विचारले तेव्हा ‘कुठे जावे लागत नाही निवडणुकीदिवशी सरकारी गाडी भरून अधिकारी येतात मशीन शाळेत ठेवतात, तिथे बटन दाबतो मतदान होते.’ असे उत्तर ग्रामस्थांनी दिले.  गाव-गावांतील पिण्याच्या पाण्याविषयी मात्र संताप व्यक्त केला. गावात ४०० लोक आहेत, एक झरा आहे. झऱ्यावर दिवसभरात ३० ते ४० घागरी बादल्या नंबरात असतात. अर्ध्या तासाला एक घागर भरते तेच पाणी पिण्याला वापरले जाते. आता झरा आटू लागला आहे, पुढच्या महिन्यात तीन किलोमीटरवरून दुसऱ्या झऱ्याचे पाणी आणावे लागेल.

सत्यजित पाटील यांनी मात्र दोन कूपनलिका मारून दिल्या हेही ग्रामस्थांनी पुन्हा सांगितले. इथूनच पुढे गेल्यावर विठ्ठलाई धनगरवाड्यात थोड्या फार फरकाने हिच स्थिती पाहायला, ऐकायला मिळाली.      

तिथून पुढे वेडा वाकडा रस्ता पार करून ‘उखळू’ गावात पोचताच तिथे हरिनाम सप्ताहाची सांगता सुरू होती. अख्खे गाव ग्रामपंचायत चौकात एकत्र होते. काही ग्रामस्थांशी 
संवाद साधला, तेव्हा शेट्टी व माने यांच्या प्रचाराची गाडी येऊन गेल्याचे सांगण्यात आले. 

हे गाव जंगलालगत असल्यामुळे गवे किंवा तत्सम वन्यजीव शेती पिकांचे नुकसान करतात. बिबट्याच्या हल्ल्यात दुभत्या जनावरांचा जीव जातो, अशा तक्रारी केल्या. तेथून पुढे चार किलोमीटरचा डोंगरी घाट चढत अंबाईचा धनगरवाड्यावर गेल्यावर दुपारच्या उन्हात धनगरवाडा शांत मात्र होता. गावात कोण आलंय अशा साशंक भावनेने महिला, एक वृद्ध पुढे आले. त्यांना लोकसभा निवडणुकीविषयी विचारले असता, त्यांनी उमेदवार आणि निवडणुकीतील पक्षही माहिती नसल्याचे सांगितले.

मतदान करणार का? असे विचारताच ‘होय करणार’ असे उत्तर मात्र महिलेने ठामपणे दिले. पण आम्हाला रोजगार काही नाही घरातील पुरुष, महिला पाच-सहा किलोमीटर चालत चांदोलीत रोजगाराला जातात. शाळेसाठीही मुलांना असेच चालावे लागते, दवाखानाजवळ नसल्याने रुग्णाला झोळीतून घेऊन जावे लागते, अशा समस्या त्यांनी मांडल्या.

दरम्यान, मलकापूर, बांबवडे, सरूड, गोंडोली, सोंडोली, मालेवाडी, आरळा या भागात शेट्टी यांचा प्रचार गेल्या पंधरा दिवसांपासून जोरात आहे; तर गेल्या आठवड्यापासून धैर्यशील माने यांचाही प्रचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

असाही विरोधाभास
कापशी गावाजवळील एका वस्तीवर धैर्यशील माने यांची सभा होणार होती. प्रचार करणारे कार्यकर्ते म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला माहीत नसतील असे धनगरवाडे, वस्तीपर्यंत पोचला आहे. धनुष्यबाणाला प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी पाऊन तासापूर्वी ज्या धनगरवाड्यांना वस्तीना भेट दिली तिथे ग्रामस्थांनी आमच्याकडे कोणीच आले नसल्याचे सांगितले होते. यातून कार्यकर्ते उमेदवारांना कशी माहिती देतात? या विषयी शंका निर्माण झाली.  

आमचे बळ भाजपला...
शाहूवाडी तालुक्‍यातील दौऱ्यात गोंडोली गावात एक विकास सोसायटीसमोर ग्रामस्थांचा गट सहकारी संस्थेचे पदाधिकारी थांबले होते. त्यांना निवडणुकीबाबत विचारताच ते म्हणाले की, आम्हाला उमेदवार कोण आहे? यापेक्षा भाजपने गेल्या चार वर्षांतील कारभारावर आम्ही समाधानी आहोत. केंद्र सरकारमध्ये भाजपची पुन्हा सत्ता यावी, असे वाटते. त्यामुळे आमच्या गावातही भाजपला साथ आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ground Report Shahuwadi Taluka