Loksabha 2019 : फसविणाऱ्या भाजपची व्होटबंदी करा - हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जत - भाजपचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जाचक अटी घालून शेतकऱ्यांची, दुष्काळग्रस्तांची फसवणूक केली आहे. नोटाबंदी करून सामान्यांना त्रास देणाऱ्यांना व्होटबंदी करून घरी बसवा, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

जत - भाजपचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जाचक अटी घालून शेतकऱ्यांची, दुष्काळग्रस्तांची फसवणूक केली आहे. नोटाबंदी करून सामान्यांना त्रास देणाऱ्यांना व्होटबंदी करून घरी बसवा, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचे स्वाभिमानाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारानिमित्त उमदी व शेगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले,‘‘राज्यात विशेषतः सांगली जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भाजप सरकारने काय मदत केली? शेतकऱ्यांना कवडीमोल दराने जनावरे विकण्याची वेळ आली. चारा छावण्या सुरू करण्यासाठी अतिशय जाचक अटी घातल्याने अद्यापही चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे हे भाजपचे सरकार शेतकरी विरोधी  आहे. या सरकारने शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले. नोटबंदी, जीएसटी या निर्णयाला पूर्णपणे या सरकारला अपयश आले आहे. म्हणून या केंद्रातल्या हुकूमशाही सरकारला कायमचे घरी बसवण्याची हीच योग्य वेळ असून अतिशय जागरूकतेने मतदान करून काँग्रेस-राष्ट्रवादी-शेतकरी संघटना या आघाडीच्या उमेदवाराना विजयी करा.

पाटील म्हणाले,‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांची गर्दी भाजपच्या सभेला असायचे या वेळी भाजपच्या सभेला खुर्च्या रिकाम्या दिसतात. भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील गोरगरीब जनतेला विकासाची खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली होती. त्यानंतर नुसत्या घोषणा देऊन लोकांना फसविले, त्यामुळे आता भाजपच्या सभेत खुर्च्या रिकाम्या दिसतात.’’

आमदार विश्वजित कदम म्हणाले,‘‘केंद्रातील भाजप सरकारने पूर्णपणे शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केलेला आहे. शेतकऱ्याच्या पिकाला दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. पण किती शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला. कोणालाही मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. जम्मू-काश्‍मीर मध्ये दररोज चकमकी घडत आहेत. त्यामुळे या सरकारला घरी बसविण्याची हीच योग्य वेळ असून आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना जत तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्‍य देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रम सावंत, माजी आमदार उमाजीराव सनमडिकर, बाबासाहेब कोडग, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, बसवराज धोडमनी, महादेव पाटील, शिवाजी शिंदे, रवींद्र सावंत, नाना शिंदे, कुंडलिक दुधाळ, भूपेंद्र  कांबळे, नीलेश बामणे, पटू गवंडी, राहुल काळे, नामदेव काळे, रवींद्र पाटील, दादा पाटील, आशिष शिंदे, सुनील निकम, निवृत्ती शिंदे, वहाब मुल्ला, अनिल शिंदे, आदी उपस्थित होते.

काँग्रेस व राष्ट्रवादीने काही चुका केल्या आहेत. जिरवाजिरवीच्या राजकारणात आमच्या सर्वांचीच जिरली आहे. याचा आता पश्‍चाताप होतोय. आता असं होणार नाही. एकदिलाने काम करून सर्व जागा जिंकू.
- हर्षवर्धन पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Harshvardhan Patil comment