Loksabha 2019 : जयंतरावांची संगत शेट्टींना नडली, हुतात्मा समुहाने फिरवली पाठ

महादेव अहिर
मंगळवार, 9 एप्रिल 2019

वाळवा - खासदार राजू शेट्टी यांनी आज क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी व हुतात्मा किसन अहिर यांच्या समाधीला अभिवादन केले. मात्र यावेळी हुतात्मा उद्योग समुहातील एकही नेता अथवा कार्यकर्ता उपस्थित नव्हता. 

वाळवा - खासदार राजू शेट्टी यांनी आज क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी व हुतात्मा किसन अहिर यांच्या समाधीला अभिवादन केले. मात्र यावेळी हुतात्मा उद्योग समुहातील एकही नेता अथवा कार्यकर्ता उपस्थित नव्हता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत केलेल्या मैत्रीमुळेच हुतात्मा समुहाने खासदार शेट्टी यांना टाळले अशी चर्चा राजकिय वर्तुळात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. शेट्टी येथे आले होते. यापूर्वी खासदार राजू शेट्टी आणि हुतात्मा उद्योग समूहाचे नाते भावकीचे होते. शेट्टी वाळव्यात आले की हुतात्मा समुहाचे सर्व कार्यकर्त्ये शेट्टीसमोर गराडा करत असत. मात्र वाळवा तालुक्यात श्री. शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी जवळीक केली आहे. त्यामुळे हुतात्मा उद्योग समूहाने श्री. शेट्टी यांच्याशी फारकत घेतली आहे.

खासदार शेट्टी यांनी आज प्रथम साखर शाळेसमोर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या समाधीवर फुले वाहिली. त्यानंतर त्यांचा ताफा हुतात्मा विद्यालयाच्या दिशेने निघाला.  वाटेत माजी सरपंच व हुतात्मा दुध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी या ताफ्याला पास झाले. मात्र त्यांनी खासदार शेट्टी यांच्याकडे पाहिलेही नाही. गौरव नायकवडी यानी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार आधीपासून सुरू केला आहे.

आजच्या वाळवा भेटीवेळी खासदार शेट्टी यांच्यासमवेत संदीप राजोबा, अशोक नवले, अभिनंदन नवले, वर्धमान मगदूम, छन्नुसीग पाटील, भागवत जाधव, नंदु शेळके उपस्थित होते.

Web Title: Loksabha 2019 Hatkanangale Lok Sabha Constituency