Loksabha 2019 : तू मोठा की मी मोठा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही शिवसेनेतील मतभेदांची दरी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. आमदार गट विरुद्ध संजय पवार गट अशी गटांत विभागणी झाली असून ‘तू मोठा की मी’ या ईर्षेच्या राजकारणात शिवसेना मात्र बाजूला पडली आहे. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे प्रचारयंत्रणा राबवत गटबाजीचे प्रदर्शन घडविले आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही शिवसेनेतील मतभेदांची दरी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. आमदार गट विरुद्ध संजय पवार गट अशी गटांत विभागणी झाली असून ‘तू मोठा की मी’ या ईर्षेच्या राजकारणात शिवसेना मात्र बाजूला पडली आहे. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे प्रचारयंत्रणा राबवत गटबाजीचे प्रदर्शन घडविले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांचा प्रामाणिकपणे प्रचार करा, असे आदेश पूर्वीच ‘मातोश्री’वरून आले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मताधिक्‍य मोजले जाईल, असेही सांगितले गेले आहे. कोण काम करतो आणि कोण नाही, याची माहिती घेण्यासाठी मुंबईहून स्वतंत्र यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. पक्ष स्तरावरून स्पष्ट आदेश असतानाही आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. 

प्रचारफेरीच्या माध्यमातून या फेरीचे सातत्याने दर्शन होत आहे. कोटीतीर्थ तलावापासून क्षीरसागर यांनी प्रचारास प्रारंभ केला. त्याचवेळी पवार यांचा गट जनता बझार चौकातून फेरीत सामील झाला. शिवाजी पेठेत रविवारी प्रचारफेरी झाली. त्यावेळी क्षीरसागर यांचे समर्थक आणि उत्तरचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले या फेरीत सामील झाले नाहीत. इंगवले यांचे त्यांचे बंधू अजय इंगवले यांच्याशी राजकीय वैर आहे. रविकिरण आमदार गटाचे असल्याने त्यांच्या विरोधात अजय इंगवले यांना प्रचारफेरीत सामील करून घेतले गेले. अर्थात ही रणनीती कुणाची हेही लपून राहिलेले नाही. 

आजही आमदार गटाने शिवाजी पेठेतून पदयात्रा काढली. त्यात पवार गटाचे तसेच दक्षिणचे उपशहरप्रमुख सुजित चव्हाण सामील झाले नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संजय पवार, सुजित चव्हाण असा गट तयार झाला आहे. आमदार गट प्रचारयंत्रणेत स्वतंत्रपणे कार्यरत आहे.

आमदार गट तसेच पवार गट स्वतंत्रपणे ताकद दाखविण्याच्या तयारीला लागला आहे. क्षीरसागर यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे. संजय पवारही खूप जुने शिवसैनिक आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पवार यांचा आत्मविश्‍वास अधिक वाढला आहे.

युतीच्या नियोजनाच्या बैठका तसेच मेळाव्यातही ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला..’ अशी घोषणा एका गटाकडून दिली जाते. दोन्ही गटांच्या वादात जे खरे शिवसैनिक आहेत, त्यांची मात्र कोंडी झाली आहे. शिवसेना म्हणून एकदिलाने काम करण्याऐवजी ‘तू मोठा की मी मोठा यातच नेते अडकले आहेत. पक्षश्रेष्ठी याची कशी दखल घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Loksabha 2019 Kolhapur Constituency Grouping issue in Shivsena