Loksabha 2019 : धनगर समाज भाजपच्याच पाठीशी - जानकर

बलराज पवार
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव
जानकर यांनी केला.

सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव
जानकर यांनी केला.

भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज श्री. जानकर सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी आमदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.

मंत्री जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण दिले आहे. आरक्षणाचा प्रश्‍न आहे. तो राज्य सरकारच्या हातात नसून केंद्राच्या हातात आहे. त्यावर न्यायालयात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यासाठी राज्यसरकारची समाजाला न्याय देण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपमुळेच मिळणार आहे.

ते म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार वाईट होते असे म्हणणार नाही. मात्र, त्यांच्या काळात सामाजिक भागिदारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन काम करणाऱ्या आघाडी सरकारने शेळी, मेंढी विकास महामंडळाला निधी दिला नाही. मात्र मी मंत्री झाल्यावर 50
कोटींचा निधी दिला. तसेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचा निधी दिला आहे. त्याचा शासन आदेश निवडणूक झाल्यावर निघेल.'

"राज्यातील युती सरकारने तसेच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाणी योजनांसाठी मोठ्याप्रमाणात निधी दिला. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांमध्ये पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम पंतप्रधान आहेत. देशाला संरक्षण आणि समृध्दी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्ष आहे', असे मंत्री जानकर म्हणाले.

मराठा आणि धनगर आरक्षण लटकले आहे. मात्र मुस्लीम समाजाला आरक्षण का लागू केले जात नाही? यावर बोलताना ते म्हणाले, मुस्लीम समाजातील ओबीसी घटकांना सर्व योजना लागू आहेत. तर त्यांच्यातील उच्च वर्णीयांना केंद्राच्या दहा
टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

पडळकरांवर नो कॉमेंट
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे पुर्वाश्रमीचे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते होते. आता विरोधात गेले आहेत. यावर बोलताना, मंत्री जानकर म्हणाले, मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. जे पक्षात नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मला मानणारा वर्ग समाजात आहे. आजही
समाज माझ्याच मागे आहे. मी समाजासाठी 30 वर्ष काम केले आहे. त्याग, संघर्ष केला आहे. समाजानेच मला मोठे केले आहे.'

मोदींमुळेच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा ओबीसी आयोगाला गेली 70 वर्ष घटनात्मक दर्जा नव्हता. याबाबत आम्ही एनडीएच्या बैठकीत मागणी केल्यावर पतंप्रधान नरेंद्र मोदींनी कायदा करुन या आयोगाला घटनात्मक दर्जा दिला आहे. यामुळे ओबीसीतील घटकांना आता केंद्राचाही निधी मिळत आहे.

रासपा युध्दात हरली तहात जिंकली
गेल्या लोकसभा निवडणुकीत रासपाला एक जागा आणि विधानसभेला सहा जागा दिल्या होत्या. यंदा एकही जागा दिली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. त्यांनी विधानसभेला पक्षाची मान्यता टिकवण्याइतपत जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे रासपा युध्दात हरली असली तरी तहात जिंकली आहे, असे मंत्री जानकर म्हणाले.

Web Title: Loksabha 2019 Mahadev Jankar comment