Loksabha 2019 : टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त विकासाचा ट्रेलर - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त विकासाचा ट्रेलर आहे. परिवर्तनाची वाट सुरु झाली आहे असे टेंभूचे पाणी आणि रस्त्यांचा विकास "ये तो ट्रेलर है' असे सांगत विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना विजयी करा

विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त विकासाचा ट्रेलर आहे. परिवर्तनाची वाट सुरु झाली आहे असे टेंभूचे पाणी आणि रस्त्यांचा विकास "ये तो ट्रेलर है' असे सांगत विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना विजयी करा असे आवाहन केले. 

सांगली लोकसभा मतदार संघातील प्रचाराचा समारोप आज झाला. भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांची विट्यात प्रचार सांगता सभा महात्मा गांधी मैदानावर झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार संजय पाटील उपस्थित होते. 

मंत्री नितीन गडकरी म्हणाले,"" टेंभू योजनेचे पाणी आलेले पाहून आनंद वाटला. यामुळे पिकांना पाणी उपलब्ध असेल. पण पाणी आले म्हणून ऊस लावून साखरेचे उत्पादन घेऊ नका. ब्राझीलमध्ये साखरेचे भाव 20 रुपये असताना आम्ही 34 रुपये धरुन उसाला दर दिला आहे. पीक पध्दतीत लक्ष घातले नाही तर पुढच्या काळात आणखी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. ऊसापासून मळीचे उत्पादन वाढवून इथेनॉलचे उत्पादन घ्या. जेवढे इथेनॉल कराल तेवढे सरकार विकत घेईल. साखरेचे उत्पादन वाढवून आपण खड्ड्यात जाऊ.'' 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्‌टी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,"" प्रश्‍न समजून न घेता आंदोलन कराल तर साखर कारखाने बंद पडतील. मग शेतकरी कुणाला ऊस विकणार? कारखानदारांनी किती चुका केल्या, भ्रष्टाचार केला त्यावर कारवाई करायला हरकत नाही. पण, साखर कारखानदारी किफायतशीर नाही. कारखानदारांचे प्रश्‍न समजून घ्या. शेतकऱ्याचे कल्याण झाले पाहिजे, त्याला पैसे मिळाले पाहिजेत. पण, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारता कामा नये.'' 

ते म्हणाले,"" इथेनॉलची इकॉनॉमी मजबूत केली पाहिजे. बायोडिझेल, बायोप्लॅस्टीकचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांची गरिबी हटल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी समृध्द, संपन्न झाला पाहिजे. तरुणांना रोजगार मिळेल. हे करण्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदी सरकार योग्य आहे. त्यासाठी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. 

तेव्हा माझे वाक्‍य आठवेल 
श्री. गडकरी म्हणाले, मला माहिती आहे पाणी आले की ऊस लावाल. माझे ऐकणार नाही. पण साखर समुद्रात फेकावी लागेल इतके उत्पादन होईल. तेव्हा माझे वाक्‍य आठवेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Nitin Gadkari comment